मुंबई : मतदानाच्या दिवशी निवडक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदार हक्क बजावत होते. वेळ संपल्यानंतरही मतदान सुरू होते. यामुळे मतदानाचा टक्का वाढला. ही मतांची वाढ निर्णायक ठरली. पण मतांमध्ये झालेली वाढ पारदर्शक आहे की त्यात गडबड आहे, असा संशय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. राज्यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी वेळ संपल्यानंतरही काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. ज्या - ज्या मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते, तिथले व्हिडीओ फूटेज बघण्यासाठी मिळावे अशी मागणी करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. मतदानाच्या दिवशी रात्री काय घडले याची माहिती मागणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
निवडणूक आयोगाने आधी 58.52 टक्के मतदान झाल्याचे सांगितले नंतर मतदान 66 टक्क्यांवर पोहोचले. ही लाखो मतांची वाढ कशी झाली ? निवडणूक आयोगाने वाढीव मतदानाबाबतही खुलासा करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. रात्री उशिरापर्यंत मतदान होते, जाहीर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत एकदम वाढ होते. हे सगळे काय सुरू आहे ? निवडणूक आयोग नशेत असतो का ? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
मतमोजणी झाली आहे. पण अनेक उमेदवार मतमोजणीत तफावत असल्याचे सांगत आहेत. जर उमेदवार तक्रार करत असतील तर तपास करुन निवडणूक आयोगाने समाधान करणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकता राखली पाहिजे. मतांमधील तफावतीच्या मुद्यांवर आणि रात्री उशिरापर्यंतच्या मतदानाबाबत खुलासा केला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात दाद मागणार असेही नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे
- निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आम्हाला संशय - पटोले
- ७६ लाख मतदानाची वाढ कशी झाली - पटोले
- 'निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही'
- नाना पटोले यांचं वक्तव्य
- रात्री 11.30 वा. कोणत्या मतदान केंद्रावर एवढं मतदान झालं - नाना
- निवडणूक आयोग नशेत असते का - पटोले
- आयोगाला वाढीव मतदानाचा खुलासा द्यावा लागेल -पटोले
- निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात लढणार - पटोले
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.