NPS Vatsalya Scheme: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गुंतवणूक करणाऱ्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) 'एनपीएस वात्सल्य' (NPS Vatsalya) योजनेच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे ही योजना आता अधिक लवचिक झाली आहे.
काय आहेत नवीन बदल?
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय गरजांसाठी निधीची अडचण भासू नये, म्हणून पीएफआरडीएने पैसे काढण्याच्या नियमात शिथिलता दिली आहे. नवीन नियमांनुसार, खातेदाराला 18 वर्षांनंतर आपल्या एकूण निधीपैकी 80 टक्के रक्कम एकाच वेळी काढता येईल. उर्वरित 20 टक्के रक्कम पेन्शनसाठी (Annuity) राखून ठेवावी लागेल. जर खात्यातील एकूण जमा रक्कम 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर पूर्ण निधी (100 टक्के) एकाच वेळी काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापी, खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनी शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी किंवा अपंगत्वाच्या स्थितीत स्वतःच्या योगदानाच्या 25 टक्के रक्कम काढता येईल.
हेही वाचा - Gold-Silver Price : गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे बदल
शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी (Equity Investment)
पेन्शन योजनांमधील कमी परताव्याची समस्या दूर करण्यासाठी, आता 75 टक्के पर्यंत निधी शेअर बाजारात (Equity) गुंतवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे दीर्घकाळात मुलांच्या नावावर एक मोठी रक्कम जमा होण्यास मदत होईल.
हेही वाचा - Insurance Fraud: एका वर्षात 26 हजारांहून अधिक लोकांची चुकीच्या विम्याने फसवणूक! IRDAI चा धक्कादायक अहवाल
काय आहे 'एनपीएस वात्सल्य' योजना?
एनपीएस वात्सल्य ही अल्पवयीन मुलांसाठी केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली विशेष पेन्शन योजना आहे. 18 सप्टेंबर 2024 रोजी ही योजना अधिकृतपणे सुरू झाली. पालक आपल्या मुलांच्या नावाने यात गुंतवणूक करू शकतात, जी मूल 18 वर्षांचे होईपर्यंत सक्रिय राहते आणि त्यानंतर नियमित एनपीएस खात्यात रूपांतरित होते.