Tuesday, November 18, 2025 09:59:32 PM

IPS Puran Kumar Suicide : काय आहे IPS पूरन कुमार यांच्या सुइसाईड नोटमध्ये? पत्नीही आहे वरिष्ठ IAS अधिकारी

आत्महत्या करण्याच्या नऊ दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली होती आणि त्यांनी पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. घटनेच्या वेळी ते रजेवर होते.

ips puran kumar suicide  काय आहे ips पूरन कुमार यांच्या सुइसाईड नोटमध्ये पत्नीही आहे वरिष्ठ ias अधिकारी

चंदीगड : हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) वाय. पूरन कुमार हे मंगळवारी (7 ऑक्टोबर) चंदीगडमधील सेक्टर 11 येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

कोण होते वाय. पूरन कुमार?
वाय. पूरन कुमार हे 2001 च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी होते आणि हरियाणा केडरमधील वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती.
आत्महत्या करण्याच्या नऊ दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली होती आणि त्यांनी पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. घटनेच्या वेळी ते रजेवर होते.

नेमकी घटना आणि सुसाईड नोटचा खुलासा
चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) कंवरदीप कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरन कुमार यांनी दुपारी 1.30 वाजता घराच्या साउंडप्रूफ बेसमेंटमध्ये (तळघर) स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांच्या सर्व सुरक्षा रक्षकांना घराबाहेर जाण्याचे आदेश दिले होते. सुरक्षारक्षक व कर्मचारी बाहेर गेल्यानंतर ते तळघरात गेले आणि खुर्चीत बसून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

मृत्युपत्र व सुसाईड नोट: सुरुवातीला कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर त्यांना पूरन कुमार यांचे मृत्यूपत्र आणि एक सुसाईड नोट मिळाली आहे. मंगळवारी दुपारी ते त्यांच्या घरातील बेसमेंटमध्ये (तळघर) मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती, तर त्यांच्या हातात सर्व्हिस रिव्हॉल्वर होती. सोमवारी त्यांनी त्यांच्या गनमॅनकडून सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतले होते.

हेही वाचा - Cough Syrup Ban: सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष; 2 वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या कफ सिरप फॉर्म्युलामुळे 16 हून अधिक चिमुरड्यांचा मृत्यू

सुसाईड नोटमध्ये कार्यालयातील समस्यांचा उल्लेख
पोलिसांना घटनास्थळी तपास करताना पूरन कुमार यांचे मृत्युपत्र आणि एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कार्यालयातील समस्यांचा (Office Issues) स्पष्ट उल्लेख केला आहे. तसेच, ते कामाच्या ठिकाणी समाधानी नव्हते, हे त्यांच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव, प्रशासनिक छळ (Administrative Harassment) यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रे लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. गृह मंत्रालयाच्या नियमांचे उल्लंघन, अनुसूचित जातीच्या (SC) आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमधील पक्षपाती वागणूक आणि भेदभाव याबाबत त्यांनी तक्रारी केल्या होत्या. 
सध्या पी. कुमार यांच्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, ही नोट पूरन कुमार यांचीच असल्याची खात्री झाल्यानंतर ती माध्यमांसमोर आणली जाईल.

पत्नी वरिष्ठ IAS अधिकारी
पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी आहेत. त्या देखील 2001 च्या बॅचच्या हरियाणा केडरमधील अधिकारी आहेत. ज्या वेळी पूरन कुमार यांनी आत्महत्या केली, तेव्हा त्यांची पत्नी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर गेल्या होत्या. अमनीत पी. कुमार या मुख्यमंत्री सैनी यांच्यासोबत गेलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात सदस्य होत्या.
पोलिसांनी सध्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू केले असून, सर्व संभाव्य शक्यता तपासून या प्रकरणाचा निष्पक्ष खुलासा लवकरच करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मोठे व्यवहार करण्यासाठी आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ अनिवार्य ; NPCI कडून नवा नियम


सम्बन्धित सामग्री