Friday, March 13, 2026 12:58:35 PM

Ayatollah Khamenei Death: इराणचे सर्वेसर्वा खामेनेईंच्या मृत्यूवर भारत गप्प का ? मोदी सरकारने प्रतिक्रिया न देण्यामागे दडलंय 'हे' मोठं कारण

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सध्या भीषण संघर्ष सुरू असून, भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत भारताला स्वहिताची भूमिका घेणे अपरिहार्य आहे.

ayatollah khamenei death इराणचे सर्वेसर्वा खामेनेईंच्या मृत्यूवर भारत गप्प का  मोदी सरकारने प्रतिक्रिया न देण्यामागे दडलंय हे मोठं कारण

Ayatollah Khamenei Death : इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आणि राजकीयदृष्ट्याही सर्वेसर्वा असलेले अयातुल्ला अली खामेनेई यांना लक्ष्य करून संपवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सध्या भीषण संघर्ष सुरू असून, भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हत्येचा निषेध का केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या मौनामागे भारताचे दीर्घकालीन धोरण आणि खामेनेई यांचा भारतविरोधी इतिहास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

भारताची अधिकृत भूमिका आणि शांततेचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर गंभीर चिंता व्यक्त केली. भारताला या भागात केवळ शांतता आणि स्थिरता हवी आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, कोणतेही वाद हे केवळ चर्चा आणि सहकार्यातूनच सुटू शकतात. भारत कोणत्याही एका बाजूने उभा न राहता शांततेच्या बाजूने असल्याचे दिल्लीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

खोमेनी यांचा भारतविरोधी 'ट्रॅक रेकॉर्ड'
भारताने या हत्येचा अधिकृत निषेध न करण्यामागे अयातुल्ला अली खामेनेई यांनी भारताच्या अंतर्गत विषयात अनेकदा केलेली लुडबूड हे प्रमुख कारण मानले जात आहे. 2017 ते 2024 या काळात खामेनेई यांनी अनेकदा भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी वक्तव्ये केली होती:

- 2017 (काश्मीर मुद्दा): खामेनेई यांनी काश्मीरमधील मुस्लिमांना एकजूट होण्याचे आवाहन करून पाकिस्तानची री ओढली होती.
- 2019 (आर्टिकल 370): जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 हटवल्यानंतर त्यांनी भारतावर टीकेची झोड उठवली होती.
- 2020 (दिल्ली दंगल व CAA): दिल्ली दंगलीवेळी खामेनेई यांनी हिंदू पीडितांविषयी कोणतीच संवेदना व्यक्त केली नाही. पण त्यांनी केवळ एका बाजूची भूमिका घेत #IndianMuslimsInDanger अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली होती. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) मुस्लिम विरोधी म्हटले होते.
- सप्टेंबर 2024: खामेनेई यांनी भारताची तुलना गाझा पट्टी आणि म्यानमारशी करून भारतीय राजनैतिक वर्तुळात संताप निर्माण केला होता.

हेही वाचा - India On War Alert: पश्चिम आशिया धगधगत असतानाच भारताचा सीमेवर मोठा लष्करी संदेश; पाच मार्चपासून महासराव, 'नोटाम' जारी झाल्याने खळबळ

राजकीय दबाव आणि इराणी दूतावासाची विनंती
भारतातील विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मोदी सरकारवर पारंपरिक परराष्ट्र धोरणापासून फारकत घेतल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, रविवारी भारतातील इराणी दूतावासाने मोदी सरकारकडे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्याची अधिकृत विनंती केली आहे. मात्र, भारताने राष्ट्रीय हित आणि खामेनेई यांच्या जुन्या भूमिकेचा विचार करून सध्या स्वहिताचा पवित्रा घेतला आहे.

आगामी आव्हाने आणि भारताची चिंता
खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणने समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका गटात सामील न होता, आपल्या हिताचे रक्षण करणे हे भारताचे प्राधान्य राहिले आहे. भारताने दाखवलेले हे मौन हे खामेनेई यांनी भारताच्या अंतर्गत विषयात दिलेल्या त्रासाला मिळालेले एक प्रकारचे राजनैतिक प्रत्युत्तर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा - US Warn Citizens : काहीतरी भयंकर होण्याच्या वाटेवर? अमेरिकेने जारी केला हाय अलर्ट, नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे आदेश...


सम्बन्धित सामग्री