Tractor Insurance : भारतातील यांत्रिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वाटा मोठा आहे. ट्रॅक्टरला केवळ एका यंत्राचा दर्जा नसून तो शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि प्रगतीचा आधारस्तंभ मानला जातो. भारतीय शेतीत इतर अवजारांसोबतच ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची कामे केली जातात. नांगरणीपासून मालवाहतुकीपर्यंत प्रत्येक कामात साथ देणारा हा लाखो रुपयांचा ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी मोठी गुंतवणूक असते. मात्र, अचानक उद्भवणारे अपघात, चोरी किंवा नैसर्गिक संकटामुळे या मौल्यवान मालमत्तेचे नुकसान झाले, तर शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडू शकते. म्हणूनच, ट्रॅक्टरचा विमा उतरवणे ही आजच्या काळातील केवळ गरज नसून एक महत्त्वाची सुरक्षा गुंतवणूक ठरत आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांमध्ये आणि ट्रॅक्टर मालकांमध्ये टॅक्टरच्या विम्याविषयी फारशी जागरूकता नाही. ट्रॅक्टरसाठी कोणता विमा घ्यावा, कसा घ्यावा, याविषयी माहिती घेऊ..
अकल्पित संकटांपासून आर्थिक संरक्षण
ट्रॅक्टर केवळ शेतातच नाही, तर ग्रामीण रस्ते आणि महामार्गांवरही धावतो. रात्रीची कामे, ओव्हरलोडिंग किंवा अवघड वळणांमुळे अपघाताचा धोका नेहमीच असतो. ट्रॅक्टर विम्यामुळे अपघातात झालेल्या मोडतोडीचा दुरुस्ती खर्च विमा कंपनीकडून मिळतो. तसेच, आग लागणे, वीज पडणे, भूकंप, पूर किंवा वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे ट्रॅक्टरचे नुकसान झाले, तरी शेतकरी विम्याद्वारे भरपाई मिळवू शकतो. चोरीच्या वाढत्या घटना पाहता, ट्रॅक्टर चोरीला गेल्यास त्याच्या बाजारमूल्याइतकी मोठी रक्कम विम्याद्वारे परत मिळू शकते, ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टळते.
कायदेशीर अनिवार्य आणि 'थर्ड पार्टी' कव्हर
मोटार वाहन कायद्यानुसार, भारतात कोणत्याही वाहनाचा विमा असणे अनिवार्य आहे. ट्रॅक्टरचा विमा नसेल, तर शेतकऱ्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 'तृतीय पक्ष विमा' (Third-Party Insurance). जर तुमच्या ट्रॅक्टरमुळे चुकून दुसऱ्या व्यक्तीचा अपघात झाला, कोणाला इजा झाली किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी आणि द्यावी लागणारी भरपाई विमा कंपनी उचलते. यामुळे शेतकरी कोर्ट-कचेरीच्या कटकटीतून आणि मोठ्या आर्थिक दंडापासून मुक्त राहतो.
दरम्यान, काही वेळेस 'थर्ड पार्टी कव्हर' कमी पैशांत मिळतो, म्हणून अनेक जण पूर्ण कव्हर न घेता केवळ एवढाच कव्हर घेतात. मात्र, असे केल्यामुळे खरोखरच एखादा अपघात झाला आणि त्यात स्वतःचे नुकसान झाले, तर भरपाई मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही वाहनासाठी पूर्ण कव्हर घेणेच फायदेशीर ठरते. कमी प्रिमिअममध्ये आपल्या गरजेनुसार अधिकाधिक फायदे देणारी पॉलिसी विचार करून निवडावी.
हेही वाचा - Agriculture News : ग्रामीण भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; कायदेशीर तोडगा निघणार?
कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी तर विमा 'वरदान'च
आज बहुतांश शेतकरी बँक किंवा पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करतात. अशा वेळी ट्रॅक्टरचे नुकसान झाले किंवा तो चोरीला गेला, तर हातातील साधन जातेच; पण डोक्यावर कर्जाचा डोंगर मात्र कायम राहतो. अशा गंभीर परिस्थितीत ट्रॅक्टरचा विमा असेल, तर विम्याची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा होऊन कर्जफेडीचा ताण कमी होतो. म्हणूनच बँका देखील ट्रॅक्टर विम्यास प्राधान्य देतात. याशिवाय, विम्याच्या पॉलिसीमध्ये आता चालकाचा अपघाती विमा (Personal Accident Cover) देखील समाविष्ट असतो, ज्यामुळे कुटुंबालाही सामाजिक सुरक्षा मिळते.
कमी प्रीमियममध्ये मोठा दिलासा
अनेकांना वाटते की, विमा काढणे म्हणजे विनाकारण खर्च आहे, पण प्रत्यक्षात ट्रॅक्टरच्या किमतीच्या तुलनेत त्याचा वार्षिक प्रीमियम (हप्ता) अत्यंत कमी असतो. आजकाल ऑनलाईन प्रक्रियेमुळे विमा काढणे आणि दाव्याची (Claim) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत सुलभ झाले आहे. नुकसानीच्या वेळी तातडीने मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यासाठी ताकद देते. त्यामुळे आपला ट्रॅक्टर आणि आपला शेती व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ट्रॅक्टरचा विमा काढणे हिताचे आहे.
हेही वाचा - UPI transactions: जानेवारीत UPI ने गाठला विक्रमी टप्पा, तब्बल 28.33 लाख कोटींचे व्यवहार, देशभर डिजिटल क्रांतीला गती