वकील सदावर्तेंना जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आता याप्रकरणी आता गुणरत्न सदावर्ते यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील ११५ एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
राज्यात मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा अशा अनेक जिल्ह्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर केला आहे. तसेच अकोल्याच्या अकोट न्यायालयाकडूनही सदावर्तेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशही एसटी महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात एकीकडे संप संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात येत आहे तर दुसरीकडे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आज संपकारी कर्मचारी शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्यासह ११५ एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, आता न्यायालयाने सदावर्ते आणि एसटी कर्मचारी यांचा जामीन अर्ज मान्य केला आहे.