Wed. Jun 29th, 2022

विधान परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात

विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ नाही. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

२८८ आमदारांपैकी २८५ आमदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात भाजपाच्या पुण्याच्या कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक व पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत खालावली असल्याकारणाने ते उद्या मतदानाला हजर होतील का? याबाबत सुद्धा अजून नक्की नाही आहे. परंतु पक्षाशी एकनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष असल्याकारणाने राज्यसभेच्या निवडणुकीत यांनी मतदानाचा अधिकार बजावला होता हे विशेष तसेच उद्या होणाऱ्या निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदार यांची १५ मत आहेत व ही १५ मत अतिशय निर्णायक ठरणार आहेत. या मतांसाठी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कितीही विनवण्या, विनंत्या व गाठीभेटी घेतल्या तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ही मते कोणाला भेटणार हे गुलदस्त्यातच राहणार आहे.

 मागील काही दिवसांपासून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी करण्यासाठी बरेच प्रयत्न सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून, त्याचबरोबर उमेदवारांकडून होताना दिसत आहेत. मागील राज्यसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीची ३ मत फार निर्णायक ठरली होती. यावेळी ती मत आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपाकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होताना दिसत आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर, भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड, त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी कुणालाही शब्द दिला नसून ते कोणाला मत देणार हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.