पुण्यात मॉर्निगवॉकला जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हडपसर परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यातच आज मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे हडपसरमधील वस्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हडपसर परिसरातील रहिवासी संभाजी आणि त्याचा मित्र अमोल लोंढे हे दोघे पहाटे साडेपाच वाजता मॉर्निग वॉकला जात होते. त्यावेळी बिबट्याने संभाजी यांच्यावर झडप घेतली. बिबट्याने झेप घेतल्यामुळे संभाजीच्या हाताला दुखापत झाली. त्याने आरडाओरड करताच बिबट्या तेथून पळून गेला. संभाजीला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बिबट्याचा तरुणावर हल्ला होताच हडपसर पोलीस, अग्निशमन दल आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा शोध सुरू असून बिबट्या अद्याप अधिकाऱ्यांच्या हाती आलेला नाही.