Sun. Jun 16th, 2019

शाब्बास मुंबईकरांनो! दिवाळीचा सण असा शुद्ध ‘हवा’!

0Shares

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झालं असून यंदा दिवाळीत एकच दिवस प्रदूषणाने ‘अतिवाईट’ स्तर गाठला.

लक्ष्मीपूजनापासून हवेचा दर्जा अतिवाईट होईल, अशी शक्यता ‘सफर’ या प्रदूषणमापन प्रणालीतर्फे वर्तवण्यात आली होती. मात्र, दिवाळीत पाडव्याच्या दिवशी हवा ‘अतिवाईट’ झाली तर इतर दिवशी’वाईट’ स्तरापर्यंतच तिचा दर्जा मर्यादित राहिला.

भाऊबीजेच्या दिवशीही हवा ‘अतिवाईट’ स्तरापर्यंत पोहोचली नव्हती.

दिवाळीमध्ये मुंबईत बोरिवली, अंधेरी, मालाड या ठिकाणी हवेच्या स्तरावर परिणाम झाला होता. अंधेरीची हवा सातत्याने ‘अतिवाईट’ स्तराची नोंदवली गेली; तर मालाड, बोरिवली येथील हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ दरम्यान दिवसागणिक बदलती होती.

भाऊबीजेच्या दिवशी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 242 होता. मालाड, अंधेरी, माझगाव येथे हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ होती. बोरिवली, चेंबूर आणि कुलाबा येथे हवेचा दर्जा ‘वाईट’ होता.

शनिवारी दिवाळीनंतर हा गुणवत्ता निर्देशांक 221 असू शकेल, असा अंदाज आहे. या आधी गेल्या वर्षी दिवाळीनंतरच्या दिवशी हा निर्देशांक 319 होता, सन 2016 मध्ये 31 ऑक्टोबर रोजी हा निर्देशांक 320 होता, तर सन 2015मध्ये 12 नोव्हेंबर रोजी हा निर्देशांक 313 होता. हे तीनही निर्देशांक हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ स्वरूपाची असल्याचे निदर्शक आहेत. त्या मानाने यंदा मात्र मुंबईकरांना यंदा तुलनेने दिवाळीत बरी हवा अनुभवता आली.

मुंबईच्या हवेचे गुणवत्ता निर्देशांक

  • धनत्रयोदशी- 87
  • नरकचतुर्दशी- 179
  • लक्ष्मीपूजन- 221
  • पाडवा- 308
  • भाऊबीज- 242
  • दिवाळीनंतरचा अंदाज (10 नोव्हेंबर)- 221

 

गेल्या दोन्ही वर्षांपेक्षा यंदा हवेचा दर्जा चांगला होता, असे ‘सफर’चे प्रकल्प संचालक गुफरान बेग यांनी सांगितले, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. व्ही. एम. मोटघरे यांनीही, जनजागृतीमुळे फटाके वाजवण्याचे प्रमाण आणि परिणामी प्रदूषण कमी झाल्याची माहिती दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *