३ सप्टेंबर, २०२४, मुंबई : लहानमोठ्यांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे यंदा शनिवारी ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरु होतो. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १० दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. यावेळी पूजेसाठी वेगवेगळ्या साहित्याची गरज असते. नेमकं हे साहित्य काय आहे जाणून घेऊयात...
गणपती बाप्पाची मूर्ती
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती आवश्यक आहे. अर्थात गणपती बाप्पाची मूर्ती आधीपासूनच बुक करून ठेवली असते. पण बऱ्याचदा विशिष्ट धातूची मूर्ती पूजनासाठी लागते तेव्हा अशी लहान आकारातील गणेशमूर्ती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण शाडूच्या मातीची मूर्ती किंवा पंचधातूपासून तयार केलेली मूर्ती बनवून घेऊ शकतो. पंचधातूपासून तयार केलेली मूर्ती आपण पुढच्यावर्षी सुद्धा वापरू शकतो.
पाट किंवा चौरंग
गणेशमूर्तीची स्थापना पाटावर किंवा चौरंगावर केली जाते. यासाठी मूर्तीच्या आकाराप्रमाणे आणि सजावटीला शोभेल असा पाट किंवा चौरंग तयार करून घेऊ शकतो.
असनासाठी कापड
गणेशमूर्तीची स्थापना करताना पाटावर किंवा चौरंगावर प्रामुख्याने लाल कापड किंवा मूर्तीच्या रंगसंगीतीसोबत शोभून दिसेल असे कापड घेऊन ठेवावे.
विड्याची पाने आणि सुटे पैसे
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना सुपारी, खायची पाने, नारळ आणि सुटेअसा विडा ठेवला जातो. यासाठी आठवणीने आधीच विड्याच्या साहित्याची तयारी करून ठेवा.
शंख
कोणत्याही शुभकार्याची किंवा पूजेची सुद्धा सुरवात करताना शंख वादन केले जाते. स्थानकाच्या स्वरांनी वातावरण मंगलमय होते.
समई, निरांजन आणि वाती
घरातील वातावरण तेजोमय करण्यासाठी आणि बाप्पाची आरासही उठावदार करण्यासाठी समईचा वापर करू शकतो. तसेच बाप्पाची आरती करण्यासाठी आरतीच्या ताटात निरंजन असणे आवश्यक आहे. निरांजन आणि समईसाठी कापसाच्या वाती तयार करून ठेवा.
कलश आणि नारळ
पूजेच्या ठिकाणी कलश ठेवला जातो. कलाशामध्ये पाणी, आंब्याची पाने आणि नारळ ठेवला जातो.
आरतीचे ताट
बाप्पाची आरती करण्यासाठी तसेच बाप्पाचे दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी आरतीचे ताट तयार असणे गरजेचे आहे. निरांजन, फुले, दुर्वा, हळद-कुंकू आणि तांदूळ या साहित्यासह आरतीचे ताट तयार करता येऊ शकते.
हळद- कुंकू, चंदन
बाप्पाला टिळक लावण्यासाठी हळद कुंकू आणि चंदनाचाही वापर केला जातो. तसेच, बाप्पाचे दर्शन घ्यायला येणारेही बाप्पाला हळद - कुंकू अर्पण करतात. त्यामुळे, अशावेळी घरात घाऊक हळद - कुंकू आणि चंदन असले पाहिजे.
धूप आणि अगरबत्ती
बाप्पाच्या पूजेसाठी आणि धूप आणि अगरबत्ती लागते. बाजारात विविध सुंगंधच्या धूप आणि अगरबत्त्या मिळतात. अशा धूप आणि अगरबत्तीमुळे वातावरण सुगंधी होते.
फुले, हार आणि दुर्वा
बाप्पाच्या पूजेसाठी वेगवेगळी फुले आणि प्रामुख्याने, बाप्पाच्या आवडीची जास्वदींची फुले आणून ठेवावीत. तसेच रोज पूजेसाठी फुलांचा हार आणि दुर्वांची जुडी सुद्धा तयार ठेवावी.
आरतीचे पुस्तक, टाळ आणि मृदूंग
बऱ्याचदा बाप्पाची आरती करताना आपण फक्त जयदेव जयदेव म्हणतो किंवा मग भलत्याच काही ओळी म्हणतो. त्यामुळे आरती म्हणताना चुकू नये यासाठी आर्टीचेपुस्तक आधीच शोधून ठेवा. तसेच, आरती श्रवणीय होण्यासाठी ताल आणि मृदूंग सुद्धा शोधून ठेवा.
मोदक आणि लाडू
गणपती बाप्पा येणार म्हटलं कि त्यांच्या आवडीचे मोदक तर असलेच पाहिजेत. त्यामुळे बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक आणि लाडू तयार ठेवा.
केळीचे पान
बाप्पा जितके दिवस आपल्या घरी राहतो तितके दिवस आपण वेगवेगळ्या पदार्थांचा, गोडा धोडाचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करतो. हा नैवैद्य केळीच्या पानात दाखवला जातो.
फळे
बाप्पाला फळांचा नैवैद्यही दाखवला जातो तसेच ही फळे नंतर प्रसाद म्हणूनही वाटली जातात. त्यामुळे किमान पाच प्रकारची फळे आधीच घरी आणून ठेवा.
पंचामृत आणि प्रसाद
बाप्पाची आरती झाल्यावर आलेल्या मंडळींसाठी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी घरी येणाऱ्या मंडळींसाठी पंचामृत आणि प्रसाद तयार करून ठेवावा लागतो. तर पंचामृतासाठी दही, दूध, मध, तूप आणि साखर या पाच पदार्थांपासून तयार केलेले पंचामृत तयार ठेवा. तसेच फळे, मोदक, शिरा, लाडू असा वेगवेगळा प्रसादही रोज देता येईल.