Thursday, February 19, 2026 09:14:38 AM

Poha Recipe: सारखे कांदेपोहे खाऊन कंटाळलात? मग आता ट्राय करा चटपटीत चटणी पोहे; जाणून घ्या सोपी रेसिपी

कांदेपोहे रोज खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यांपासून बनणारे दोन झटपट आणि चवदार पदार्थ नक्की करून पाहा. पोहा चटणी आणि चटणीचे पोहे नाश्त्यासाठी उत्तम आणि पोटभर ठरणारे पर्याय आहेत.

poha recipe सारखे कांदेपोहे खाऊन कंटाळलात मग आता ट्राय करा चटपटीत चटणी पोहे जाणून घ्या सोपी रेसिपी

Poha Recipe: पोहे म्हटले की बहुतेक घरांमध्ये पहिल्यांदा आठवतात ते कांदेपोहे. सकाळचा नाश्ता असो, पाहुणे आले असोत किंवा उपवासानंतर हलकं काहीतरी खायचं असो कांदेपोहे हा हमखास पर्याय असतो. पण रोज तेच तेच खाऊन कंटाळा येणं साहजिकच आहे. अशा वेळी पोह्यांपासूनच काहीतरी वेगळं, झटपट आणि तितकंच पोटभरीचं करायचं असेल, तर हे दोन पदार्थ नक्की करून पाहा पोहा चटणी आणि चटणीचे पोहे.

विशेष म्हणजे या दोन्ही पदार्थांची नावं जरी सारखी वाटत असली, तरी चव आणि पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. कमी वेळात तयार होणारे हे पदार्थ नाश्ता, संध्याकाळचा खाऊ किंवा हलकं जेवण म्हणूनही उत्तम ठरतात.

पोहा चटणी: पारंपरिक चवीचा झटपट पर्याय

पोहा चटणी हा कोंकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. फारशी भाजी, उकडणं किंवा तळण न करता हा पदार्थ झटपट तयार होतो.

कशी कराल?
कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी द्या. दुसऱ्या भांड्यात खोवलेलं सुकं खोबरं घ्या. त्यात थोडा गूळ (ऐच्छिक), सांबार मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सगळं एकत्र करा. तयार फोडणी या मिश्रणावर ओता आणि नीट मिसळा. शेवटी पातळ पोहे घालून हाताने हलक्या हाताने मिक्स करा.
ही पोहा चटणी साधी, झणझणीत आणि पोटभर असते. पारंपरिक पद्धतीत कांदा घातला जात नाही, पण आवडीनुसार थोडा कांदा घालू शकता.

चटणीचे पोहे: हिरव्या चटणीचा फ्रेश ट्विस्ट

हा पदार्थ थोडा मॉडर्न टच असलेला आहे. हिरवी चटणी आणि पोहे यांचा मस्त संगम म्हणजे चटणीचे पोहे.

कशी कराल?
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओल्या नारळाचे तुकडे आणि हवं असल्यास लसूण घालून बारीक वाटून घ्या. पोहे थोडेसे पाण्याने ओले करून घ्या खूप भिजवायचे नाहीत. एका भांड्यात पोहे घ्या, त्यात हिरवी चटणी आणि मीठ घालून मिक्स करा.
दुसऱ्या कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी द्या आणि ती पोह्यांवर ओता. हलक्या हाताने ढवळा आणि गरमागरम सर्व्ह करा.

हे दोन्ही पदार्थ कमी साहित्यांत, कमी वेळात तयार होतात आणि रोजच्या कांदेपोह्यांपेक्षा वेगळा स्वाद देतात. घरात पोहे असतील तर नाश्त्याचा प्रश्न लगेच सुटतो!


सम्बन्धित सामग्री