Get Rid of Negative Mindset : वारंवार नकारात्मक विचार मनात आल्यामुळे हळूहळू जीवन नीरस वाटू लागते आणि मानसिकताही नकारात्मकतेकडे झुकू लागते. प्रत्येकाच्या जीवनात कमी-अधिक चांगले-वाईट प्रसंग येतच असतात. मात्र, अति आनंदाच्या किंवा अति दुःखाच्या क्षणी मनावरील ताबा सुटू न देणं महत्त्वाचं असतं. अनेकदा मनात वाईट आणि नकारात्मक विचार येत राहतात आणि प्रयत्न करूनही ते थांबवणं शक्य होत नाही.
नकारात्मकतेपासून मुक्तता कशी मिळवायची?
असे म्हटले जाते की, मनावर कोणाचाही ताबा नसतो. कधी चांगले विचार मनात येतात तर कधी वाईट. पण जर मनात बऱ्याच काळापर्यंत सतत नकारात्मक आणि वाईट विचार येऊ लागले तर भविष्यात ही एक मोठी समस्या बनू शकते. हे टाळण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेऊन त्यांच्या मदतीने वाईट सवयी सुधारल्या पाहिजेत.
सकाळचा चहा टाळा
सकाळी उठल्याबरोबर काही खाण्यापूर्वी किंवा दातही न घासता चहा पिण्याची सवय असेल तर ती बंद करा. त्याऐवजी कोमट पाणी पिणे सुरू करा. याचे प्रमाण एका ग्लासापासून एक लिटरपर्यंत दररोज हळूहळू वाढवत न्या. दात घासल्यानंतरही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर, कोमट पाण्यात मीठ घालून त्याने दररोज चुळा भरा. त्यानंतर थोडा वेळ काही खाऊ नये.
ध्यान करा, योगासने करा, व्यायाम करा
मनात नकारात्मक विचार येऊ नयेत म्हणून, दररोज थोडा वेळ योगासने आणि त्यानंतर ध्यान करावे. असे केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. यासोबतच मनातील नकारात्मक विचारही हळूहळू दूर होऊ लागतात.
आजकाल, सर्व आजारांचे सर्वात मोठे मूळ म्हणजे आपण दररोज जास्त कॅलरीज असलेले अन्न खातो पण ते पचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही. तुमच्याही बाबतीत असे होत तर ही चूक ताबडतोब दुरुस्त करा. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा.
सकारात्मक ऊर्जा देणारा आहार असावा
मन थेट शरीराशी जोडलेले असते. याचा अर्थ असा की, आपण जे काही अन्न खातो, त्यानुसारच मन बनते. म्हणून, मांसाहारी किंवा जास्त तळलेले पदार्थ खाणं थांबवा. त्याऐवजी, सहज पचणारं अन्न खा, जे शरीराला शक्ती देईल आणि मन देखील निरोगी ठेवेल. याशिवाय, सकाळचा पहिला आहार घेताना म्हणजे न्याहारी करताना त्यात आंबवलेल्या पदार्थांचा (दही, ताक, इडली, डोसा आदी) समावेश करा.
पुरेशी झोप
तज्ज्ञांच्या मते, पुरेशी झोप हा कोणत्याही आजारावरचा सर्वात मोठा इलाज मानला जातो. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर, तुम्ही मानसिक ताणतणावाचे बळी व्हाल. तसेच, तुमचा स्वभाव रागीट आणि चिडचिडा होईल.
हेही वाचा - Raw Garlic Benefits : कच्चा लसूण खाणं ठरेल संजीवनी, दररोज खाल्ल्याने 'या' समस्या होतील दूर
विनाकारण भीतीच्या छायेत राहू नका
आयुष्य खूप अनिश्चित आहे. त्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहे, हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. पण सतत काहीतरी नकारात्मक घडत राहण्याची भीती बाळगणे योग्य नाही. त्याऐवजी जीवनात सकारात्मक विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा.
हेही वाचा - World Cancer Day : धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढला! 'हे' आहे भयावह स्थितीचं कारण
ताणतणाव टाळण्यासाठी हे करा
आज, मल्टीटास्किंग, म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता, हा एक चांगला गुण मानला जातो. लोक त्यांचे फोन आणि वर्तमानपत्रेही वॉशरूममध्ये घेऊन जातात. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की, हे मल्टीटास्किंग देखील तुमच्या तणावाचे सर्वात मोठे कारण आहे. तर ते सोडून द्या.
सोशल मीडियाचा वापर प्रमाणात करा
आजकाल स्वस्त नेट पॅक आणि मोबाईल फोनची सहज उपलब्धता यामुळे प्रत्येक व्यक्ती जगाशी जोडलेली आहे. पण त्यावर काय पहावे आणि काय पाहू नये, हे त्या व्यक्तीने स्वतः ठरवायचे आहे. जर तुम्हीही सोशल मीडिया वापरत असाल तर त्याचा योग्य वापर करायला शिका.
(अस्वीकरण : ही बातमी फक्त तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी लिहिली आहे. त्यात घरगुती उपचार आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. याचा अवलंब करण्याआधी आणि अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)