आजच्या वेगवान जीवनशैलीत झोप ही अनेकांसाठी दुय्यम ठरत आहे. ऑफिसचे काम, घराची जबाबदारी, सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर यामुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात. परिणामी, झोपेची वेळ कमी होते आणि त्याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कामावर होतो. थकवा, चिडचिड, ताण आणि छोट्याछोट्या गोष्टींवर राग येणे, हे सगळे अपुरी झोपेचे परिणाम आहेत.
तज्ज्ञ सांगतात की झोप म्हणजे केवळ विश्रांती नसून ती आरोग्याचा पाया आहे. ‘गुड स्लीप हायजीन’ म्हणजेच चांगल्या झोपेसाठी योग्य सवयी अंगीकारल्याने शरीर आणि मन दोन्ही मजबूत होतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं आरोग्यासाठी गरजेचं आहे. संशोधनानुसार, कमी झोप घेतल्यास हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक ताण वाढण्याचा धोका असतो.
झोप पूर्ण झाल्यास अनेक फायदे मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण कमी होतो आणि शरीर शांत राहतं. यामुळे मन प्रसन्न होतं, दिवस उत्साहाने सुरू होतो आणि थकवा कमी जाणवतो. चांगली झोप मानसिक आरोग्य सुधारते, चिंता व नैराश्य कमी करते आणि मन आनंदी ठेवते. तसंच स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे कामकाजात कार्यक्षमता वाढते.
याशिवाय, स्लीप हायजीनमुळे शारीरिक आरोग्यालाही आधार मिळतो. नियमित आणि गाढ झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, संसर्गाचा धोका कमी होतो आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहतं. काही अभ्यास सांगतात की चांगली झोप घेतल्याने वजन नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. इतकंच नव्हे तर झोपेमुळे मन शांत झाल्याने सर्जनशीलता व नवीन कल्पना येण्याची क्षमता वाढते.
गुड स्लीप हायजीन म्हणजे फार मोठं तंत्र नाही. काही छोट्या-छोट्या सवयी अंगीकारल्या तर झोपेची गुणवत्ता सहज सुधारते. रोज ठराविक वेळी झोपणं आणि उठणं, झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल-टीव्हीपासून दूर राहणं, बेडरूम स्वच्छ, अंधारात आणि थंड ठेवणं. या सवयी उपयुक्त ठरतात. तज्ज्ञ सांगतात की संध्याकाळी कॅफिन टाळलं, हलकं जेवण केलं आणि झोपण्याआधी ध्यान, वाचन किंवा हलकं संगीत ऐकलं तर झोप पटकन लागते आणि गाढ होते.
जर या सवयी पाळल्या नाहीत तर त्याचे दुष्परिणाम टाळता येत नाहीत. अपुरी झोप घेतल्याने सतत थकवा जाणवतो, ताण वाढतो, मूड खराब राहतो आणि मानसिक आरोग्य बिघडतं. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात.
एकंदरीत, गुड स्लीप हायजीन ही लहान पण अत्यावश्यक सवय आहे. तिच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, मन प्रसन्न होतं आणि जीवन संतुलित होतं. आजपासूनच झोपेला प्राधान्य द्या, कारण चांगली झोप ही तुमची खरी साथी आहे जी आयुष्य अधिक आनंदी बनवते.