Prada Indian Touch : इटालियन फॅशन जगतातील दिग्गज कंपनी 'प्राडा' (Prada) आपल्या नवनवीन प्रयोगांमुळे भारतात नेहमीच चर्चेत असते. आता या कंपनीने भारतीय चहाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे Infusion de Santal Chai Eau de Parfum हे नवीन परफ्यूम लाँच केले आहे. विशेष म्हणजे, भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या 'चहा'पासून प्रेरणा घेऊन हे सुगंधी द्रव्य तयार करण्यात आले असून, यामुळे फॅशन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
वेलची आणि चंदनाचा अनोखा संगम
प्राडाच्या 'लेस इन्फ्यूजन' (Les Infusions) या खास कलेक्शनचा भाग असलेल्या या परफ्यूममध्ये भारतीय चहाची चव आणि सुगंध यांची सांगड घालण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार:
- यामध्ये चंदनाचा (Sandalwood) क्रीमी पोत आणि 'चहा-लाते' (Chai Latte) मधील मसालेदार सुगंधाचे मिश्रण आहे.
- ताजी लिंबूवर्गीय फळे (Citrus) आणि वेलचीच्या (Cardamom) अर्कामुळे याला एक विशिष्ट 'वूडी' टच मिळतो.
- परफ्यूमची बाटलीदेखील चहाच्या रंगाशी मिळतीजुळती म्हणजे तपकिरी रंगाची असून तिला 'कॅमल सफियानो' कॅप देण्यात आली आहे.
हेही वाचा - World's Most Expensive Fruit: अॅव्होकॅडो किंवा ब्लूबेरी नाही, तर 'हे' आहे जगातील सर्वात महागडं फळ
कोल्हापुरी चपलांच्या वादानंतरचा नवा प्रवास
प्राडा आणि भारताचे नाते अलीकडच्या काळात चांगलेच चर्चेत राहिले आहे. 2025 च्या सुरुवातीला प्राडाने त्यांच्या उन्हाळी कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चपलांच्या डिझाइनची 'नक्कल' केल्याचा आरोप झाला होता, ज्यावरून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्राडाच्या टीमने भारतात येऊन कोल्हापुरी कारागिरीचा प्रत्यक्ष अभ्यास केला. डिसेंबरमध्ये महाराष्ट्र (LIDCOM) आणि कर्नाटक (LIDKAR) सरकारसोबत प्राडाने एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला.
'प्राडा मेड इन इंडिया' प्रकल्प
'प्राडा मेड इन इंडिया - इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चपल्स' या प्रकल्पांतर्गत आता कोल्हापुरी पादत्राणे जागतिक स्तरावर नेली जाणार आहेत. शतकानुशतके चालत आलेल्या पारंपारिक उत्पादन पद्धती आणि प्राडाची आधुनिक डिझाइन संस्कृती यांचा संगम यातून पाहायला मिळेल. चहाच्या सुगंधाचे परफ्यूम लाँच झाल्यामुळे सोशल मीडियावर भारतीय युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "भारतातील कोल्हापुरी चप्पल, पैठणी आणि चहा यांसारखी उत्पादने जागतिक स्तरावर लोकप्रिय होत आहेत," असे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Health Care : सावधान! ताप-खोकला बेतू शकतो जिवावर; 'साधी गोष्ट' म्हणून दुर्लक्ष.. आणि 15 वर्षांचा मुलगा व्हेंटिलेटरवर