Say goodbye to troublesome insects: पावसाळा म्हटला की थंडगार वारे, चिंब पावसाची सर आणि हिरवळ! पण या निसर्गाच्या सौंदर्यासोबतच काही त्रासदायक गोष्टीही घरात डोकावू लागतात त्यापैकी एक म्हणजे गोम या कीटकाचा त्रास. गोम हा एक लहान, पण अतिशय वेगाने हालचाल करणारा कीटक आहे. त्याचे शरीर चकाकीदार आणि काळसर रंगाचे असून, तो दमट आणि अंधाऱ्या जागांमध्ये राहायला पसंत करतो. अनेक वेळा तो अंथरुणात, कपड्यांमध्ये किंवा लहान मुलांच्या वस्तूंमध्ये लपतो, त्यामुळे चावण्याचा धोका अधिक असतो.
विशेषतः पावसाळ्यात गोम हा बाथरुमच्या पाईप, सिंक, नाले, खिडक्या आणि दरवाजांच्या फटीतून घरात प्रवेश करतो. यामुळे लहान मुलांना किंवा झोपलेल्या व्यक्तींना चावण्याचा, शरीरात शिरण्याचा धोका संभवतो. गोमचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकजण कीटकनाशक वापरतात, मात्र त्यातील रसायनांचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. म्हणूनच, घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.
गोम निर्मूलनासाठी घरगुती स्प्रे तयार करण्याची सोपी पद्धत:
साहित्य:
2 चमचे तुरटी पावडर
2 चमचे मीठ
1 चमचा काळी मिरी पावडर
1 लिटर पाणी
ही सर्व पावडर एकत्र करून तुम्ही थेट घरात शिंपडू शकता किंवा हे मिश्रण 1 लिटर पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करू शकता. हे नैसर्गिक मिश्रण गोमसारख्या कीटकांना दूर ठेवण्यास मदत करते. तुरटीमध्ये असलेले तिखटपणा आणि विशिष्ट वास यामुळे कीटकांना त्या जागा नकोशा वाटतात.
स्प्रे वापरण्याची योग्य पद्धत:
ज्या जागांमधून गोम येण्याची शक्यता अधिक आहे अशा ठिकाणी बाथरुमचे कोपरे, पाण्याची जाळी, सिंक, नाले, स्टोअर रूम, बेसमेंट, भेगा, खिडक्या आणि दरवाज्यांचे कडे या जागांवर दर दोन ते तीन दिवसांनी हा स्प्रे करावा. यामुळे गोमचा त्रास टाळता येतो.
अधिक प्रभावी उपाय:
दरवाजे आणि खिडक्यांच्या कडे तुरटीची पावडर शिंपडल्यास गोम घरात प्रवेश करणार नाही.
पावसाळ्यात भिंती ओलसर होतात. अशा भेगांमध्येही हे मिश्रण शिंपडणे आवश्यक आहे.
लहान मुलांच्या झोपण्याच्या जागा, कपड्यांची शेल्फ, ओले कपडे ठेवण्याची ठिकाणे इथे विशेष लक्ष द्यावे.
या उपायांमुळे तुम्ही कोणतेही रसायन न वापरता गोम, गांडूळ, किंवा इतर लहान कीटकांचा त्रास सहजपणे कमी करू शकता. हे उपाय पर्यावरणपूरक असून घरातील वयोवृद्ध, लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित आहेत.
पावसाळा आनंदाने साजरा करताना घराच्या स्वच्छतेकडे आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये. गोमसारख्या छोट्या पण त्रासदायक कीटकांपासून घराला मुक्त ठेवण्यासाठी घरगुती उपाय हाच उत्तम मार्ग आहे. तुरटी, मीठ आणि मिरी यांचा हा नैसर्गिक फॉर्म्युला वापरून घरात स्वच्छता आणि आरोग्य राखा