Shopping Bags: ऑनलाईन ऑर्डर घरी आली की हातात येणारा बॉक्स असो किंवा मॉलमधून खरेदी केल्यानंतर मिळणारी कागदी पिशवी बहुतांश वेळा तिचा रंग एकच असतो, तो म्हणजे तपकिरी (Brown). आज बाजारात असंख्य आकर्षक रंग, डिझाईन आणि प्रिंट्स उपलब्ध असताना मोठ्या कंपन्यांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सगळेच तपकिरी कागदी पिशव्यांवर का अवलंबून असतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. हा केवळ सवयीचा भाग नसून, यामागे पर्यावरण, खर्च आणि मजबुतीशी संबंधित ठोस कारणे दडलेली आहेत.
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रिसायकलिंग. बहुतांश तपकिरी कागदी पिशव्या या जुन्या वर्तमानपत्रे, वापरलेले कार्डबोर्ड आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केल्या जातात. हा सगळा कच्चा माल एकत्र करून लगदा बनवला की त्याचा नैसर्गिक रंग तपकिरीच असतो. हा रंग तसाच ठेवला तर वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे वेळ वाचतो आणि उत्पादन खर्चही कमी होतो.
याच्या उलट, पांढरा कागद तयार करायचा असेल तर त्यावर ब्लीचिंग आणि रासायनिक प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया खर्चिक तर असतेच, पण पर्यावरणासाठीही हानिकारक ठरते. त्यामुळे शॉपिंग बॅग्ससाठी ब्लीच न केलेला तपकिरी कागद अधिक योग्य मानला जातो. यामुळे पिशव्या स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनतात.
तपकिरी पिशव्यांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यांची ताकद. या पिशव्या सहसा ‘क्राफ्ट पेपर’पासून बनवल्या जातात. ब्लीच न केल्यामुळे कागदातील नैसर्गिक तंतू मजबूत राहतात. त्यामुळे अशा पिशव्या जड वजन सहज पेलू शकतात. किराणा सामान, पुस्तकं किंवा कपड्यांची पॅकेजिंग करताना या पिशव्या अधिक विश्वासार्ह ठरतात.
व्यावसायिक दृष्टीने पाहिलं तर खर्चाचं गणितही महत्त्वाचं आहे. रंगीत किंवा पांढऱ्या कागदासाठी अतिरिक्त प्रक्रिया, रंग आणि प्रिंटिंग लागते. यामुळे एका पिशवीची किंमत वाढते. तपकिरी पिशव्यांवर मात्र साध्या काळ्या रंगात लोगो किंवा नाव छापलं तरी ते स्पष्ट दिसतं. म्हणूनच मोठ्या ब्रँड्सनाही हा पर्याय परवडणारा आणि परिणामकारक वाटतो.
पर्यावरणाच्या दृष्टीनेही तपकिरी कागदी पिशव्या अधिक फायदेशीर आहेत. प्लास्टिक पिशव्या विघटनासाठी शेकडो वर्षे घेतात, तर कागदी पिशव्या काही दिवसांतच मातीत मिसळतात. त्या कुजून खत तयार करण्यासाठीही वापरता येतात. त्यामुळे पर्यावरणावर होणारा ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो.
पुढच्या वेळी हातात तपकिरी कागदी पिशवी आली, तर ती केवळ एक साधी बॅग नाही, तर पर्यावरण रक्षण, खर्च बचत आणि शहाण्या उत्पादन प्रक्रियेचं प्रतीक आहे, हे लक्षात ठेवा. साध्या रंगामागे दडलेलं हे ‘ब्राऊन गणित’ खरोखरच रंजक आहे.