Mon. Jan 18th, 2021

#LoksabhaElection2019 : घात, मात आणि झंझावात!

मुंबईत सहाही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीला जोरदार फटका बसला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठी खूप मोठी संधी असूनदेखील काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष , कमकुवत संघटन आणि अर्थातच नरेंद्र मोदींचा वाढलेला प्रभाव हा आघाडीच्या अपयशाला कारणीभूत ठरला आहे. काँग्रेसचा परंपरागत मुस्लिम मतदार हा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने उभा झालेला दिसला नाही. किंवा तो मतदानकेंद्रापर्यंत पोहोचू दिला नाही असाही आरोप केला गेला आहे.

 

शहरी मतदारांवर भाजपचा म्हणजे मोदींचा प्रभाव

भाजपला शहरी मतदारांचा मोठ्या प्रमाणात असलेला पाठिंबा हा मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्यावी यासाठी होता अस दिसून आलं आहे. मात्र मोदींची जी महाप्रतिमा तयार करण्यात आली होती आणि शिवाय महाप्रचंड असा प्रचारही मजबूत संघटनेच्या ताकदीवर करण्यात आला होता त्याचाही खूप फायदा भाजपला झाला आहे.

मोदींच्या तुलनेमध्ये राहुल गांधी यांच नेतृत्व हे या निवडणुकीत प्रभावी ठरू शकलं नाही. याशिवाय सरकारी योजनांचे लाभार्थी हे भाजपचे मतदार व्हावे म्हणून भाजपन केलेले जोरदार प्रयत्न यशस्वी झालेले दिसून येत आहे. भाजप सोबत शिवसेनेला मागच्या निवडणुकी सारखाच याही वेळी मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सेनेची जागावाटपात बार्गेनिंग पॉवर ही कमी करण्यात भाजपला आताच यश मिळालं अस म्हणता येईल.

राज ठाकरे मोदी शाह यांच्या विरोधात मैदानात ताकदीने उभे झाले असले तरी त्यांचा प्रभाव हा युतीला मुंबईत यशापासून रोखू शकला नाही. अर्थात शरद पवार यांच्या युक्तिवादाप्रमाणे विधानसभेचे निवडणुकीचे गणित हे खूप वेगळे राहणार आहे. मात्र ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या जागी धडाडीने काम करणाऱ्या नव्या नेत्याला येत्या काळात ताकद द्यावी लागणार आहे. कारण जी चुक काँग्रेस ने केली आहे तीच जर पवार करणार असतील तर भविष्यात या जागेवर त्यांना कधीही विजय मिळवता येणार नाही.

 

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव मुंबईच्या आसपास

वंचित बहुजन आघाडीचा आणि इतर पक्षांचा प्रभाव मुंबईत फार दिसला नाही त्यामुळे आघाडी आणि युती मध्येच प्रामुख्याने लढत पाहायला मिळाली. अर्थात वंचित बहुजन आघाडीचा मुंबईच्या आसपासच्या जागांवर मोठा प्रभाव दिसला आहे. अर्थात त्यांच्यामुळे आघाडीच्या जागा हरल्या नाहीत. कारण युतीच मताधिक्य त्याहूनही खुप जास्त आहे. मात्र ठाणे ,कल्याण डोंबिवली आणि भिवंडी येथील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तीस हजारापासून तर 50 हजारापर्यंत मतं मिळाली आहेत त्यांची ही मतांची टक्केवारी आघाडीला धडकी भरवणारी आहे कारण विधानसभेची निवडणूक खूपच जवळ येऊन ठेपली आहे.


काट्याच्या लढतीत महाराष्ट्रात

इतरत्र आघाडीतील सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मात्र वंचितमुळे जबरदस्त फटका बसल्याच बहुजन समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मान्य करून प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. अर्थात आंबेडकरांना आघाडीची चांगलीच जिरवायची होती ती मोहीम मात्र त्यांनी फत्ते केली आहे. मात्र त्यांच्या पुरोगामीत्वावर आता भल मोठं प्रश्नचिन्ह लागलं आहे आणि त्यांच्या स्वभावानुसार त्याची उत्तरही त्यांनी शोधूनही ठेवली आहेत.

मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाने केला सर्वांचा घात

मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त निवडणुकीच्या मैदानात खूपच उशिरा उतरले अर्थात मोदी जादूने तसंही त्यांना जिंकण्यापासून दूरच ठेवलंच असतं. हे आता निकालावरून आपल्याला दिसतच आहे. मात्र प्रिया यांना उमेदवारी देण्याशिवाय राहुल गांधी यांना कोणताही पर्याय नव्हता आणि त्यांनी निवडणूक मनावर घेऊनही काँग्रेसच्या नेत्यांनी अंग चोरुन काम केल्याचं आता उघडच झालं आहे. या दोघांच्याच यशाबद्दल पक्षाला थोडी बहुत खात्री होती.

संजय निरुपम यांनी ज्येष्ठांच्या मदतीने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या गळी उत्तर मुंबईची उमेदवारी उतरवल्यानंतर स्वतः उत्तर पश्चिम मध्ये ताकद पणाला लावली..मात्र त्यांनी ज्या पद्धतीच मुंबई काँग्रेसच राजकारण केलं तेच त्यांच्या अंगलट आल्याचं आता स्पष्ट होत आहे.

बाकी उर्मिलाने भाजपच्या दिग्गज गोपाळ शेट्टी यांना शेवटपर्यंत घाम फोडला होता त्याचीच चर्चा अधिक रंगलेली पाहायला मिळाली.अर्थात काँग्रेसची ताकद त्यांना शेवटपर्यंत मिळालीच नाही. आपल्या अंगभूत गुणांनी निवडणूक लढवून उर्मिलाने गमावलं काहीच नाही मात्र कमावलं भरपूर.

दक्षिण मध्य मुंबईतून दुसऱ्यांदा एकनाथ गायकवाड यांना हार पत्करावी लागली. त्यांना वयाच्या 79 व्या वर्षी निवडणुकीत उतरवणं काँग्रेसला अर्थातच महागात पडलं आहे. त्यांची आमदार मुलगी वर्षा यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल असल तरी अस्तास चाललेल्या त्यांच्या वडिलाना तिकीट देण्याची घोडचूक पक्षाची झाली आहे. कायम जातीपातीच्या राजकारणाच्या चष्म्यातून पाहणं हे कधीकधी किती घातक ठरू शकत यांची जाणीव राहुल गांधी यांना वेळीच करून देण्याची गरज आहे.

अर्थात राहुल यांनी मुंबईतील पहिल्याच बीकेसी येथील सभेत चारही बाजूला वळलेली आपल्या नेत्यांची तोंड ऐका दिशेला वळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न जरूर केला. मात्र त्यांच्या नतद्रष्ट नेत्यांनी काँग्रेसची नाव पूर्णपणे पाण्यात बुडविण्याचा घाट घातला आहे. अशा या नेत्याचे वेळीच कान खेचण्याचे महाकठीण काम राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी करावे लागेल. कारण पक्षाची मुंबईची कमान विश्वासू मिलिंद देवरा यांच्याकडे निवडणुकीतच सोपवल्यानंतर देवरा यांचा पराभव झाला आहे. अर्थात त्यांना विधानसभा निवडुकीपर्यंत आता जिवाचं रान करून राहुल यांचे खांदे बळकट करावे लागणार आहे.

राज फॅक्टर

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मोदी आणि शाह यांच्या विरोधातल्या सभाना टुरिंग टॉकीज संबोधनाऱ्या मंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा राज यांची खिल्ली उडवली आहे.राज यांनी स्वतःच ‘ अनाकलनीय ‘ अस ट्विट करून चुप्पी साधली आहे..त्यामुळे राज ठाकरे फॅक्टरच सविस्तर विश्लेषण नंतर करावं लागणार आहे. मात्र मोदी यांच्या जिंकण्यान त्यांच्या पदरात जे पडणार होत त्यापासून ते सध्या तरी वंचित राहिले आहे.

जाता जाता पराभवानंतरही खंबीरपणे मुंबईत माध्यमाला सामोरे जाताना शरद पवार यांनी स्पष्ट केलं की आता मोदी यांना बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही ईव्हीएम यंत्रांना दोष देत बसणार नाही. मात्र मोठ्या प्रमाणात लोकांनी तक्रारी केल्यानंतर त्याची दखल आम्हाला घ्यावी लागली. पवारांनी आपली भूमिका जरी आता पातळ केली असली तरी.

निकालाच्या रात्री एक मराठी हॉटेल व्यावसायिक मित्र माझ्याशी बोलताना म्हणाले की , ‘ मोदींच्या विरोधात दिसलेला माहोल ईव्हीएम यंत्रांतून गायब कसा झाला असावा याचे राहून राहून मला आश्चर्य वाटतं.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *