Sun. Feb 28th, 2021

नांदुरा बसस्थानकात प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण!

प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणार्‍या एका प्रेमी युगुलाला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली.  नांदुरा बस स्थानकात ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या या घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी प्रेमाच्या नादात भान विसरून अश्लील चाळे करणारे प्रेमिक हल्ली सर्वत्रच सर्रास दिसू लागले आहेत. प्रेमी युगुलं आपण कुठे आहोत, आसपास कोण आहेत याचं भान विसरून एकमेकांमध्ये हरवून गेले असतात. याबद्दल काहीवेळा आसपासचे लोक नावं ठेवत असतात, काहीजण चोरून ही दृश्य पाहत असतात, तर काहीजण याला नैसर्गिक आणि खासगी बाब समजून दुर्लक्ष करत असतात. पण दरवेळी या प्रेमीयुगुलांना तितकंसं आपल्याच प्रेमविश्वात हरवता येतंच, असं नाही. यापूर्वी कोलकाता येथेही ट्रेनमध्ये प्रेमाचे चाळे करणाऱ्या प्रेमी जोडप्याला ट्रेनमधील लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. अशाच प्रकारची घटना आता बुलडाण्यातील नांदुरा येथील बस स्थानकावर घडली. मात्र यावेळी मुलीच्या घरच्यांनीच दोघांना मारहाण केली आहे.

काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अप-डाऊन करतात.

यातील एक विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत नांदुरा येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती.

याची माहिती तिच्या कुटुंबियातील मंडळींना मिळाल्यावरून मंडळींनी बस स्थानकातून गाठून दोघांना रंगेहाथ पकडले.

तेथेच त्यांना बेदम मारहाण केली.

मुलीसह तिच्या सोबत बोलत असलेल्या युवकालाही बेदम मारहाण करण्यात आली.

यानंतर मुलीकडील मंडळी तिला घेऊन निघून गेले.

या घटनेचे बघ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये चित्रीकरण केले.

काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केला.

याप्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये  कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नसून सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याची चर्चा नांदुरा शहरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *