Mon. Dec 6th, 2021

सराफाच्या दुकानातून भरदिवसा लाखोंचे दागिने लंपास

बुलडाणा : सराफाच्या दुकानातून भरदिवसा लाखोंचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथील श्रीकृष्ण ज्वेलर्सवर चोरट्यांनी भरदिवसा चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे.

सदर घटनेचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

नेहमीप्रमाणे सिंदखेडराजा येथील सोन्या चांदीचे व्यापारी प्रदीप इवरकर श्रीकृष्ण ज्वेलर्समध्ये सकाळी 11 वाजता पोहचले. तेव्हा एका दुकानाचे शटरचे कुलुप उघडून दुकानात सोन्या चांदी ची बॅग ठेवली. आणि दुसऱ्या शटरचे कुलूप उघडण्यासाठी गेले.

यावेळीस अज्ञात चोरट्याने पाळत ठेऊन दुकानात ठेवलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग उचलून पळ काढला.

भरलेली बॅग घेऊन चोर दुकानापासून थोड्याच अंतरावरील मुंबई-नागपूर हायवेपर्यंत पळत गेला. तेथून त्याच्या मागून दोन्ही साथीदार बाईकवरून आले आणि त्याला गाडीवर बसवून फरार झाले.

चोरट्याचे आणि त्याचे साथीदार दुकानातील आणि इतर ठिकाणच्या cctv मध्ये कैद झालेत. शहरात चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आपली तपास चक्रे फिरवली आहेत. दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *