राणा दाम्पत्याकडून नवी दिल्लीत महाआरती

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसत आहे. कधी राज ठाकरेच्या भोंग्यावरून तर कधी नवनीत राणा आणि रवी राणांच्या हनुमान चालिसा पठणावरून राजकारणात गदारोळ होत आहे. आता शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. परंतू त्या आधीच राणा दाम्पत्यानी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. १४ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत जाहीर होणाऱ्या सभेपूर्वी राणा दाम्पत्य महाआरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवत राणा दाम्पत्याने दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती केली. आणि राणांकडून हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करण्यात आली. यावेळी हनुमान मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
राणा दाम्पत्याने शनिवारी (२३ एप्रिल) मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती.