Sun. Sep 19th, 2021

चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वर बनलंय जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण!

जगात सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणाऱ्या मॉसिनराम, चेरापुंजीला मागे टाकत महाबळेश्वर पहिल्या क्रमांकावर आलं आहे. हवामान खात्याने नुकतीच या बाबतची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार यंदा मॉसिनराम शहरात आजपर्यंत साडे 6 हजार मिमी पावसाचा टप्पा पार केला आहे. तर महाबळेश्वर शहरात साडे 7 हजार मिमी पाऊस झाला आहे. तब्बल 13 वर्षांनतर 1 जून ते 8 सप्टेंबर अखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद येथे झाली होती.

कोकण, पश्चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे नेहमीच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते.

महाबळेश्वर येथे सदाहरीत घनदाट जंगल उंच डोंगररांगा अशी भौगोलिक स्थिती असून, येथे पावसाळयात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरलेली असते.

अशा वातावरणात येथे वर्षा सहलीसाठी मोठया संख्येने पर्यटक येतात आणि पावसाचा आनंद लुटतात.

यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाउस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्वर शहराची नोंद झाली आहे.

सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजी ओळखले जातं. मात्र गेल्या काही वर्षांत थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्याबाबतच्या नोंदीतून हे स्पष्ट होतंय.

‘द वेदर चॅनेल इंडिया’नेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये महाबळेश्वर येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचं नमूद केलं आहे. यामध्ये एक जूनपासून नोंदविलेल्यानुसार महाबळेश्‍वरमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याचे नोंदवलं आहे.

महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातील पाणी पातळी वाढते तर चिपळूण, महाडसह कोकणातील काही भागावर या पावसाच्या पाण्याचा परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *