Fri. Sep 30th, 2022

महापोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश

पिंपरी चिंचवड : महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पिंपरी चिंचवड मध्ये फज्जा उडाला. परीक्षेवेळी लाईट गेल्याने कॉम्प्युटर बंद पडले. त्यामुऴे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घातला. हिंजवडीतील अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍण्ड मॅनेजमेंट इथे ही परीक्षा होती.

एसएससी बोर्डमध्ये क्लार्क पदं भरली जात आहेत. याचीच भरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे राबवली जातीये. याच पहिल्या बॅचची परीक्षा 2  डिसेंबरला सकाळी दहा वाजता सुरु झाली. शेकडो विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सुरू करून लॉगिन ही केलं. पण अचानक लाईट गेली, अन सर्व यंत्रणा ठप्प झाली.

अवघ्या अर्ध्या तासात एक दोनदा नव्हे तर तब्बल दहा ते बारा वेळा विजेने घोळ घातला. खरं तर इन्व्हर्टर अथवा जनरेटर ठेवून पर्यायी व्यवस्था करणं हे अपेक्षित होतं. पण महापोर्टलकडून तशी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नव्हती.

यासंपूर्ण प्रकारानंतर राज्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे शिक्षकांनी खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केलं, त्यांनी आमची लायकी काढल्याचा आरोप ही विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले अन अखेर हिंजवडी पोलिसांना पाचारण करावं लागलं.

पोलिसांनी मध्यस्थी करत महापोर्टल विभागाशी फोनवरून संपर्क साधला. पोलिसांनी समन्वय साधत प्रकरणावर तूर्तास तरी पडदा टाकला.

मात्र महापोर्टलमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, यातून प्रामाणिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहावं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने हे महापोर्टल कायमस्वरूपी बंद करावं अशी मागणी केली. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. याबाबत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून लेखी निवेदन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.