Sun. Jun 20th, 2021

प्रवचन द्यायला आला, महाराज विवाहितेला घेऊन पळाला!

आपल्या रसाळ वाणीने धार्मिक आणि आध्यात्मिक कथा सांगून लोकांना सन्मार्गाला जाण्याची प्रेरणा देण्यासाठी एक महाराज भंडारा येथील भागवत सप्ताहाला बोलावलं गेलं. पण या महाराजांनी चक्क तेथील एका विवाहितेसोबत धूम ठोकली. या घटनेने सारं गावच हैराण झालं. दिनेशचंद्र मोहतुरे असं या महाराजाचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

भंडाराजवळील मोहदुरा येथे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान भागवत सप्ताह आयोजित केला होता.

दिनेशचंद्र मोहतुरेला या सप्ताहासाठी आमंत्रित केलं होतं.

या महाराजाने आठवडाभर रसाळ प्रवचन करताना गावातील एका विवाहितेला आपल्या जाळ्यात ओढून घेतलं.

ही विवाहिता 5 वर्षाच्या मुलीची आई आहे. या विवाहितेच्या सासऱ्याची मोहतुरे महाराजावर गाढ श्रद्धा होती.

मात्र या भामट्या महाराजाने विवाहितेला कधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, ते तिच्या कुटुंबियांनाही समजलं नाही.

बुधवारी ही विवाहिता घरात कुठेही दिसेना, म्हणून कुटुंबियांनी गावभर शोध घेतला. मात्र ती कुठेच आढळून न आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तिचा शोध घेता घेता पोलीस आणि कुटुंबिय सावनेर येथील कुबडा गावी पोहोचले. तेव्हा हा महाराजही बेपत्ता असल्याचं समजलं.

या महाराजाची माहिती काढली असता या महाराजाची आधीही 3 वेळा लग्नं झाली असल्याचं समजलं. याच्या तिन्ही बायका या महाराजाला वैतागून निघून गेल्याची माहिती मिळाली. या महाराजाशी कुटुंबियांद्वारे संप्रक साधल्यावर आपण संबंधित विवाहितेसोबत वृंदावनात असल्याचं मोहतुरेने सांगितलं.

महाराजाच्या रसाळ वाणीचा असा परिणाम पाहून गावकरी मात्र हैराण झाले आहेत. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असाच हा प्रकार असल्याचं दिसून आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *