गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ यंदा २,२०० जादा गाड्या सोडणार

कोकणातील नागरिकांना अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली.
मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. नागरिकांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. १६ जुलै पासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.
गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २,२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावणार आहे.
काय आहेत सुविधा?
• ४ ते १० सप्टेंबर – एसटी गाड्यांचा प्रवास
• १४ ते २० सप्टेंबर- कोकणातून परतीच्या प्रवास
•१६ जुलै- एसटी आरक्षणाला सुरुवात
•एकाचवेळी परतीच्या प्रवासाचे आरक्षण करणे शक्य
•प्रवासापूर्वी सर्व बसेस सॅनिटाईज केल्या जाणार
•प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक
•नैसर्गिक विधीसाठी तात्पुरती प्रसाधानगृहे उभारणार
•मार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक तैनात करणार