Thu. Sep 16th, 2021

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १०० व्या वर्षात पदार्पण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ९९ वा वाढदिवस आज पुण्यात साजरा केला जात आहे . बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वत: उपस्थित आहेत. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात २० बाय १५ फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच ९९ दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातील इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्र भूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत.

‘वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचे आहे, असे मनोगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वाढदिवसानिमित्त व्यक्त केले. बाबासाहेबांचा आज वाढदिवस. ते १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत’.
‘मी खरेतर वेगळे असे काही केले नाही. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकेच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळाले तर छान हसत-खेळत स्वावलंबी असावे. शंभरावे वर्ष लागले. कदाचित विधात्याची ही इच्छा असावी. या काळात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव कधी आणला नाही’ असे बाबासाहेब पुरंदरे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *