Jaimaharashtra news

‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे’

 

मुंबई : मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो ३ प्रकल्पाचं काम आधी कारशेडच्या प्रश्नामुळे रखडलं आणि आता इथून पुढे ते निधीअभावी रखडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आधीच लांबलेला आणि आर्थिकदृष्ट्याही खर्चिक झालेल्या प्रकल्प अडचणीत आला आहे.

राज्य सरकारकडून कारशेडचा प्रश्न मार्गी न लागल्याने या कर्जाचा हा चौथा हफ्ता स्वीकारण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मेट्रो-३ कारशेडच्या या रखडपट्टीवर आता भाजपच्या आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

जपान सरकार मेट्रो-३ च्या निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही राज्य सरकारने फंड नाकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे’, अशी उपरोधिक टीकाही शेलार यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज्य सरकारने कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर केंद्र आणि काही खासगी विकासकांनी आपला हक्क सांगितला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यावर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीतही या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती आहे. ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!’, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव : आशिष शेलार

मेट्रो-३ च्या उभारणीमधील जपानकडून दिल्या जाणाख्या निधीचा चौथा टप्पा देण्यास जपान सरकार तयार आहे. मात्र, राज्य सरकारने हा निधी नाकारल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. प्रकल्पामध्ये वाढलेला दहा हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टचे फसवे कारण देऊन राज्य सरकारने निधी नाकारल्याचे त्यांनी सांगितलं. “मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने तीन हजार कोटी द्यायला तयार आहोत, असं एमएमआरडीएचे माजी आयुक्त आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितलं. सरकार म्हणतं आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी? कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी..खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय. जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा.” अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे .

Exit mobile version