Tue. Dec 7th, 2021

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तर

मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. बुधवारी पहिल्याच पावसात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे बंद करण्याची वेळ आली.

दरम्यान भाजपाने यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपच्या टीकांना उत्तर देताना महापौरांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मालाड इमारत दुर्घटनेमुळे आणि पावसातल्या महापालिकेच्या नियोजनावर भाजपने केलेल्या टाकेला उत्तर देताना, ‘भाजपाला वाट्टेल ते बरळण्याचा अधिकार आहे, ते स्वप्नात आहेत म्हणून बरळत आहेत. त्यांनी भो भो करत राहावं’, असं उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं होतं.

त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पेडणेकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून, ‘माननीय महौपार किशोरी पेडणेकर यांचं हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे’, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *