सीईटी ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळ बंद

अकरावीचे सीईटी ऑनलाईन नोंदणीचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे काही कालावधीसाठी राज्य मंडळाकडून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी दिला जाईल, असे राज्य मंडळाने म्हटले आहे.
अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी १ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. मात्र अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने संकेतस्थळ तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला. सीईटीसाठीचे प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा २० ते २६ जुलै या कालावधीत उपलब्ध करून दिली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले आहे.
राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेतली जाणार आहे. राज्य मंडळामार्फत २१ ऑगस्टला ११ ते १ या वेळेत अकरावीसाठीची सीईटी परीक्षा होणार आहे.