Wed. Dec 8th, 2021

‘आमच्या माणसांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही’

चिपळूण: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ‘आम्हाला तातडीने मदत करा’, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्रात जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो’, असं या व्यापाऱ्यांनी राणे यांना सांगितलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संपूर्ण परिस्थितीला उद्धव ठाकरे यांचा पायगुण जबाबदार असल्याची टीका राणे यांनी केली. ‘या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे’, असं नारायण राणे म्हणाले.

चिपळूणला येण्यापूर्वी राणे तळीयेमध्ये गेले होते. यावेळी ‘या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जातील,आमच्या माणसांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही’, असं राणे म्हणाले.

तसेच ‘स्थानिक लोक सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्व घटनेची माहिती दिली जाईल. नुकसानीचं स्वरुप सांगितलं जाईल. त्यांनीही मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे’, असं राणे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *