Tue. Oct 19th, 2021

राज्यातील टाळेबंदी पुन्हा वाढणार?

देशात फेब्रुवारीनंतर कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले. महाराष्ट्रातही १४ एप्रिलपासून टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. आता राज्यात १ जूनपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टाळेबंदीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.

टास्कफोर्स आणि बालरोगतज्ज्ञांची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्र आणि दिल्लीतील नवीन कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र, मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. त्यातच कोरोनाचं नवीन म्युटेंट लहान मुलांसाठी घातक असल्याने तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्यबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.

यावेळी, ‘राज्यात कोरोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजून यश मिळालेलं नाही’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.

पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. ज्यात आपण अनुभवतोय की युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे, असंदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *