Thursday, February 12, 2026 02:55:28 PM

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या जाण्याने कुटुंबीयांसाठी न भरून निघणारी पोकळी! कुटुंबात कोणाच्या होते सर्वात जवळ?

अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबावर आणि त्यांच्या लाखो समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे.

ajit pawar plane crash अजित पवारांच्या जाण्याने कुटुंबीयांसाठी न भरून निघणारी पोकळी कुटुंबात कोणाच्या होते सर्वात जवळ

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांचे आज (28 जानेवारी 2026) सकाळी 8:45 च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे झेडपी (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी निघाले होते. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण 6 जणांचा (2 वैमानिक, 1 सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी) जागीच मृत्यू झाला आहे. DGCA ने या अपघाताला दुजोरा दिला असून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पवार कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबावर आणि त्यांच्या लाखो समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या मागे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन मुले – पार्थ पवार आणि जय पवार असा परिवार आहे. सुनेत्रा पवार या अनेकदा निवडणूक सभांमध्ये त्यांच्यासोबत सक्रिय असायच्या, तर मोठा मुलगा पार्थ यानेही राजकारणात प्रवेश केला आहे. अजित पवार हे त्यांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार आणि काका शरद पवार यांच्या अत्यंत जवळ होते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्य तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचा - Eknath Shinde Program Cancel : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधन शोकभावनेत उपमुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम आणि सभा रद्द

प्रशासनावरील पकड आणि 'दादा' नावाचा दबदबा
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. वयाच्या 23 व्या वर्षी (1982 मध्ये) एका सहकारी साखर कारखान्यातून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. भल्या पहाटे 6:00 वाजता कामाला सुरुवात करणारे आणि प्रशासनावर जबरदस्त वचक असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. सलग 7 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. 

अर्थ, नियोजन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने सांभाळली होती. बारामतीचा विकास आणि राज्याचे आर्थिक नियोजन यात त्यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. अजित पवार यांच्या अचानक कायमचं निघून जाण्याची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Passed Away: साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे उपमुख्यमंत्री; पण नियतीच्या एका वळणाने 'दादां'चा राजकीय प्रवास थांबवला


सम्बन्धित सामग्री