Tuesday, February 17, 2026 07:49:48 PM

Pune Election Results : पुण्यात देवाभाऊंना 'भाव', दादांची 'दादागिरी' संपुष्टात

पुण्यात पुन्हा एकदा भाजपचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

pune election results  पुण्यात देवाभाऊंना भाव दादांची दादागिरी संपुष्टात

पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपने आघाडी घेतली असून, पुण्यात पुन्हा एकदा भाजपचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईनंतर राज्यातील सर्वात महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यावर भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याकडे ठोस पावले टाकली आहेत.

एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे सातत्याने दिसून येते. यंदाच्या निवडणुकीतही पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखवत स्पष्ट कौल दिला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप तब्बल ८७ जागांवर आघाडीवर असून अनेक प्रभागांमध्ये संपूर्ण पॅनेल भाजपने जिंकले आहे.

भाजपने प्रभाग क्रमांक १ मध्ये बॉबी टिंगरे, संगीता दांगट आणि अश्विनी भंडारी यांना विजयी केले. प्रभाग क्रमांक ३ मध्ये डॉ. श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे आणि रामदास दाभाडे यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १० मधून रूपाली पवार, दिलीप वेडेपाटील, किरण दगडे आणि अल्पना वरपे विजयी ठरले.

प्रभाग क्रमांक ३६ मध्ये महेश वाबळे, सई थोपटे, शैलजा भोसले आणि वीणा घोष यांनी भाजपचा झेंडा फडकावला. प्रभाग क्रमांक २० मधून तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे आणि राजेंद्र शिळीमकर विजयी झाले. प्रभाग क्रमांक २२ मध्ये मृणाल कांबळे, अर्चना पाटील आणि विवेक यादव यांनी बाजी मारली.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये परशुराम वाडेकर (०८अ), अजित गायकवाड (०८ब), सपना छाजेड (०८क) आणि सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण (०८ड) यांनी भाजपला यश मिळवून दिले. प्रभाग क्रमांक ४० मध्ये अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम आणि रंजना टिळेकर विजयी ठरल्या. तसेच प्रभाग क्रमांक १८ मधून कालिंदी पुंडे आणि कोमल शेंडकर यांनी भाजपची ताकद वाढवली.

दरम्यान, इतर पक्षांच्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि साहिल केदारी (प्रभाग १८), रफिक शेख (प्रभाग २२) यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गौरव घुले (प्रभाग २०) आणि रेखा टिंगरे (प्रभाग १) विजयी ठरल्या आहेत.

या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार गटाने युती केली असली, तरी भाजपच्या लाटेसमोर ही युती अपुरी ठरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.

एकूणच, पुणे महापालिकेच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की शहराच्या राजकारणात सध्या भाजपच वरचढ आहे. आता नव्या महापौर आणि महापालिका सभागृहाकडून पुण्याच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या