Latur Municipal Corporation Election Result : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालांकडे लागले होते. यात लातूर महानगरपालिकेने पहिला निकाल स्पष्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने विजयाचा झेंडा फडकवत बहुमताचा टप्पा पार केला आहे. या विजयामुळे राज्याच्या राजकारणात काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यात ताकद दाखवून दिली असून विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आकडेवारीचे समीकरण: काँग्रेस-वंचित युतीची सरशी
लातूर महापालिकेच्या एकूण 70 जागांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. बहुमतासाठी 36 या जादूई आकड्याची गरज असताना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने 37 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. यामध्ये काँग्रेसने स्वबळावर 32 जागा जिंकल्या आहेत, तर मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने 5 जागांवर यश मिळवले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपला केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागले असून, त्यांचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.
त्रिशंकू लढतीत युतीचा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी
यंदाची लातूरची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात ही प्रमुख लढत होती. एकूण 369 उमेदवार रिंगणात असताना काँग्रेसने 65 आणि वंचितने 5 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही पक्षांच्या युतीमुळे मतांचे विभाजन टळले आणि त्याचा थेट फायदा सत्ता मिळवण्यात झाला. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि इतर पक्षांना मतदारांनी नाकारल्याचे कल सांगत असून, लातूरकरांनी विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, MIM यांच्या वाट्याला किती जागा आल्या, याबाबत स्पष्टता मिळणे बाकी आहे.
हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय भूकंप; शिवसेनेच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग? MIM ची अनपेक्षित मुसंडी
महापौरपदावर काँग्रेसचा दावा निश्चित
बहुमताचा आकडा गाठल्यामुळे आता लातूर महानगरपालिकेचा आगामी महापौर काँग्रेसचाच होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. या यशात माजी मंत्री अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रणनीतीचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. भाजपला आपल्या 70 जागांच्या ताफ्यासह केवळ 14 जागांपर्यंत मर्यादित ठेवणे, हा काँग्रेससाठी मोठा नैतिक विजय मानला जात आहे. या निकालामुळे उर्वरित महानगरपालिकांच्या निकालांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज, 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष सुरू केला होता. लातूर शहरात काँग्रेसने मिळवलेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. प्रशासकीय यंत्रणेने चोख बंदोबस्त राखल्याने मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. आता नव्या प्रशासनाकडून लातूरच्या प्रलंबित पाणी प्रश्नासह रस्ते आणि स्वच्छतेच्या कामात काय गती मिळते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Dhule Municipal Corporation Results 2026 : निकालाआधीच खान्देशातील वातावरण तापलं, धुळे महानगरपालिकेत कोण मारणार बाजी?