Monday, February 16, 2026 04:11:19 AM

Mahapalika Election 2026 : मतदानाची शाई पुसल्याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा 'म्हैसूर पॅटर्न' परतणार

निवडणूक आयोगाने आता जुन्या आणि खात्रीशीर असलेल्या 'म्हैसूर पॅटर्न'च्या निळ्या शाईचा वापर पुन्हा सुरू करण्याचा विचार केला आहे. ही शाई एकदा लावल्यानंतर किमान 15 ते 20 दिवस पुसली जात नाही, असा अनुभव आहे.

mahapalika election 2026  मतदानाची शाई पुसल्याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय पुन्हा एकदा म्हैसूर पॅटर्न परतणार

Mahapalika Election 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदानादरम्यान बोटावरील शाईवरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अनेक मतदान केंद्रांवरून अशा तक्रारी आल्या होत्या की, मतदारांच्या बोटाला लावलेली शाई ही मार्कर पेनची असल्याने ती अवघ्या काही मिनिटांत पुसली जात होती. या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि राजकीय पक्षांनी बोगस मतदानाचा संशय व्यक्त केल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, पारदर्शकता राखण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये 'मार्कर पेन'चा वापर बंद करण्याच्या हालचाली आयोगाने सुरू केल्या आहेत.

पारंपारिक निळी शाई आणि 'म्हैसूर पॅटर्न'चा वापर
निवडणूक आयोगाने आता जुन्या आणि खात्रीशीर असलेल्या 'म्हैसूर पॅटर्न'च्या निळ्या शाईचा वापर पुन्हा सुरू करण्याचा विचार केला आहे. ही शाई एकदा लावल्यानंतर किमान 15 ते 20 दिवस पुसली जात नाही, असा अनुभव आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर वापरलेले मार्कर पेन अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसल्याने, प्रशासनाने पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हा नवीन (किंवा जुनाच) बदल अमलात आणला जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - BMC Election Results 2026 : मुंबई महापालिकेची आताची आकडेवारी काय?; पहा अजून किती जागांचे अंतिम निकाल येणं बाकी, पक्षनिहाय आकडेवारी समोर

5 फेब्रुवारीच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी येऊन ठेपल्या आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये शाईवरून झालेला गोंधळ पुन्हा होऊ नये, यासाठी आयोगाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. "लोकशाहीच्या उत्सवात मतदाराचा विश्वास महत्त्वाचा असतो आणि शाई पुसली जाण्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते," असे मत अनेक निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे म्हैसूर इंक कारखान्याकडून पुरेशी शाई उपलब्ध करून घेण्याबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि आयोगाचे स्पष्टीकरण
या शाईच्या वादानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर जोरदार टीका केली होती. विशेषतः मुंबई आणि पुण्यातील मतदानावेळी मार्कर पेनची शाई सॅनिटायझर किंवा थिनरने निघत असल्याचा दावा राजकीय नेत्यांनी केला होता. मात्र, आयोगाने आता ही चूक सुधारण्याचे संकेत दिले आहेत. आगामी ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये आणि मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी हा बदल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या काही दिवसांत मार्कर पेनच्या वापराबद्दलचा अंतिम निर्णय अधिकृतपणे जाहीर केला जाईल.

हेही वाचा - PMC Election Results 2026: रवींद्र धंगेकरांच्या पत्नीला मोठा धक्का! तुरुंगातून लढणाऱ्या आंदेकर भगिनी विजयी


सम्बन्धित सामग्री