सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी नवीन राजकीय समीकरणे होताना दिसत आहेत. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्याचे एका पत्रकाद्वारे समोर आणले आहे. आमदार सोपल यांनी या युतील महाआघाडी हे नाव दिले आहे. या महाआघाडीत दोन्ही शिवसेना यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी या गटांचाही समावेश असल्याचे नमूद केले आहे. परिणामी, भाजपविरोधात या मतदारसंघात इतर सर्व पक्ष एकवटले असल्याचे यातून दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढली होती. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट कधीही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले नाही. परंतू, बार्शीतील पोस्टरने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : KDMC Shivsena UBT: कल्याण - डोंबिवलीमध्ये महापौर निवडीपूर्वीच राडा; ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता, पक्षाकडून तक्रार दाखल
बार्शी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी इंस्टाग्राम पोस्ट करत दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे संकेत दिले आहे. या मतदारसंघात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना पराभूत करून सोपल यांनी आमदारची मिळवली. त्यामुळे दोघेही कट्टर विरोधक आहेत. बार्शीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान, भाजपविरूद्ध इतर पक्ष असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. या घडामोडी स्थानिक पातळीवर होत असून अद्याप दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतू महाआघाडीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येत असेल तर शिंदे गट आणि ठाकरे गट प्रथमच युती करत असल्याचे पाहायला मिळू शकेल.