Friday, February 13, 2026 09:22:56 AM

BMC Election 2026: मुंबई कुणाची? निर्णय उद्या, पण 'या' उमेदवारांचे निकाल जाहीर होणार उशिरा, जाणून घ्या नेमकं कारण

सन 2017 च्या निवडणुकीत मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली होती. मात्र, यंदा ही प्रक्रिया सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

bmc election 2026 मुंबई कुणाची निर्णय उद्या पण या उमेदवारांचे निकाल जाहीर होणार उशिरा जाणून घ्या नेमकं कारण

मुंबई: येत्या शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांचे भवितव्य स्पष्ट होणार असले तरी, निकाल हाती येण्यासाठी मुंबईकरांना यंदा मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मुंबईत उत्साहात मतदान पार पडत आहे. आता सर्वांचे लक्ष 16 जानेवारीच्या मतमोजणीकडे लागले आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या एका ‘विशेष’ नियमावलीमुळे निकालाचा वेग मंदावणार असून, संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी शुक्रवारची संध्याकाळ किंवा रात्र उजाडण्याची शक्यता आहे.

टप्प्याटप्प्याने मोजणी; निकालाला लागणार ‘ब्रेक’

मुंबईत 23 विविध केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यंदा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, प्रत्येक केंद्रावर एका वेळी केवळ दोन प्रभागांचीच मतमोजणी केली जाईल. एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या (RO) नियंत्रणाखाली 8 ते 13 प्रभाग येत आहेत. यातील पहिल्या दोन प्रभागांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील दोन प्रभागांच्या मशीन उघडल्या जातील. ही प्रक्रिया ‘साखळी’ पद्धतीने चालणार असल्याने, सर्व 227 प्रभागांचे कल एकाच वेळी न येता टप्प्याटप्प्याने समोर येतील.

हेही वाचा: Thane Mahanagar Palika : तुमच्या प्रभागात कोण उमेदवार? ठाणे महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

हाय-व्होल्टेज लढती आणि विलंबाचे सावट

या नव्या पद्धतीमुळे मुंबईतील अनेक दिग्गजांच्या निकालांना विलंब होणार आहे. विशेषतः ‘A’, ‘B’ आणि ‘E’ वॉर्डातील 225 ते 227 या प्रभागांमधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर आणि गौरवी शिवलकर यांचा निकाल या ‘फेज’ पद्धतीमुळे उशिरा लागण्याची शक्यता आहे. तसेच, ‘G उत्तर’ वॉर्डमधील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या विशाखा राऊत आणि शिवसेनेच्या प्रिया सरवणकर यांच्यातील चुरशीच्या लढतीचा निकालही दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत लांबणीवर पडू शकतो.

10 वाजता सुरुवात; राजकीय वर्तुळातून नाराजी

सन 2017 च्या निवडणुकीत मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली होती. मात्र, यंदा ही प्रक्रिया सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. सुरुवातीची 2 तासांची कपात आणि त्यात ‘दोन-दोन प्रभाग’ मोजणीचे धोरण, यामुळे राजकीय पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. “जर सर्व प्रभागांची मोजणी समांतरपणे सुरू केली असती, तर दुपारपर्यंत निकाल स्पष्ट झाले असते,” असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. EVM मोजणीसाठी प्रत्येक प्रभागाला किमान 14 टेबल देण्यात आले असले, तरी ही मोजणी एकामागून एक होणार असल्याने तांत्रिक सज्जता असूनही वेळेचा अडसर निर्माण होणार आहे.

प्रभाग 131 मध्ये काय होईल? 

‘N’ वॉर्डमध्ये समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक 123 ते 133 च्या मोजणीवरही लक्ष असेल. येथे प्रभाग 131 मधून राखी जाधव या भाजपकडून नशीब अजमावत आहेत. येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे एकूण 11 प्रभागांची जबाबदारी असल्याने, शेवटच्या क्रमांकावरील प्रभागांचे निकाल हाती येण्यासाठी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रशासनाने या प्रक्रियेमागे नेमके काय कारण आहे हे स्पष्ट केले नसले तरी, मनुष्यबळाचे नियोजन आणि अचूकतेसाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

मुंबईच्या सत्तेची चावी कोणाकडे?

आजचे मतदान संपल्यानंतर EVM आता कडक बंदोबस्तात सील करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, तेव्हा मुंबईच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार, याचे सुरुवातीचे कल साधारणतः दुपारी 12 वाजेनंतरच स्पष्ट होतील. सुमारे 1700 उमेदवारांचे भविष्य या पेट्यांमध्ये बंद असून, बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या 74,427 कोटी रुपयांच्या बजेटवर कुणाचे नियंत्रण राहणार, याचा निर्णय उद्याच्या ऐतिहासिक पण ‘थोड्या संथ’ निकालात होणार आहे.

हेही वाचा: Nagpur Election 2026: 'योग्य उमेदवाराला मत देण्यासाठी...', मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवतांचे महाराष्ट्राला आवाहन


सम्बन्धित सामग्री