Sunday, February 15, 2026 08:19:04 AM

Pune Election Road Updates: पुणेकरांनो, उद्या मतदानाला जाताय ना? मग 'हे' रस्ते टाळा, हे आहेत पर्यायी मार्ग

पुणे स्टेशन आणि मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या समर्थ वाहतूक विभागांतर्गत पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक आणि संत कबीर चौक ते क्वार्टर गेट दरम्यानचे रस्ते बंद राहतील.

pune election road updates पुणेकरांनो उद्या मतदानाला जाताय ना मग हे रस्ते टाळा हे आहेत पर्यायी मार्ग

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता उच्चांक गाठला असून, उद्या 15 जानेवारी रोजी शहरात लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, हजारो कर्मचारी आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना केंद्रापर्यंत पोहोचताना अडथळा येऊ नये आणि शहराचा वेग मंदावू नये, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी 14 ते 16 जानेवारी या कालावधीत विशेष वाहतूक नियमावली जाहीर केली आहे. ‘पुणेकर’ म्हणून शिस्त पाळत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘हे’ मार्ग टाळा

हडपसर परिसरातील मतदानाची मुख्य केंद्रे लक्षात घेता, या भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. साने गुरुजी परिसराकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी गोंधळ टाळण्यासाठी हडपसर वेस्ट अमरधाम स्मशानभूमी मार्ग किंवा माळवाडी डी.पी. रस्ता यांचा पर्याय निवडावा. तसेच गाडीतळ भागातून येणाऱ्या प्रवाशांनी संजीवनी हॉस्पिटल डी.पी. रस्ता मार्गे सिद्धेश्वर हॉटेलकडे जाणे सोयीचे ठरेल.

कोरेगाव पार्क आणि विमानतळ परिसरातही सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. कोरेगाव पार्कच्या अंतर्गत रस्त्यांवर, विशेषतः नॉर्थ मेन रोड (लेन ‘C’) ते पाणीपुरवठा केंद्र आणि महात्मा गांधी चौक ते मौलाना आझाद स्मारक हे मार्ग बंद असतील. विमानतळ परिसरात फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता आणि निको गार्डन परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. या भागात प्रवासासाठी कोरेगाव पार्क जंक्शन ते ABC फार्म किंवा विमान नगर चौक हे मुख्य मार्ग वापरावेत.

हेही वाचा: Sanjay Raut : 'महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय ते चुकीचं...', निवडणुकांना काही तास शिल्लक असतानाच संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

पुणे स्टेशन आणि मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या समर्थ वाहतूक विभागांतर्गत पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक आणि संत कबीर चौक ते क्वार्टर गेट दरम्यानचे रस्ते बंद राहतील. या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी शांताई हॉटेल, बाहुबली चौक किंवा ‘सेव्हन लव्हज’ चौकचा मार्ग स्वीकारावा. मध्यवर्ती पुण्यातील ही वाहतूक वळवल्यामुळे पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

विश्रामबाग आणि दत्तवाडी यांसारख्या गजबजलेल्या भागातही प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. पुरम चौक ते टिळक चौक दरम्यानची वाहतूक बंद असल्याने नागरिकांनी शास्त्री रस्ता वापरून दांडेकर पुलामार्गे प्रवास करावा. तसेच बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा ते ना. सी. फडके चौक आणि सारसबागेची खाऊ गल्ली पूर्णतः बंद असेल. येथील वाहनचालकांना अप्पा बळवंत चौक (ABC) किंवा पुरम चौकचा पर्याय देण्यात आला आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या या बदलांचे मुख्य उद्दिष्ट मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे हे आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत जड वाहने आणि खाजगी वाहनांना विशिष्ट ठिकाणी प्रवेशबंदी असेल. पुणेकरांनी या काळात अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने बजवा आणि वाहतुकीचे नियम पाळून एक सुजाण नागरिक म्हणून आपला सहभाग नोंदवा.

हेही वाचा: Gold-Silver Price : गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे बदल


सम्बन्धित सामग्री