Thursday, February 19, 2026 08:39:55 AM

Suhas Babar on Fadnavis: "आमच्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री" सांगलीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान; भाजपच्या 'या' नेत्याला दिला इशारा

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांच्या विधानामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

suhas babar on fadnavis quotआमच्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्रीquot सांगलीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान भाजपच्या या नेत्याला दिला इशारा

विटा: "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो," या उक्तीचा प्रत्यय सध्या सांगलीच्या राजकारणात येत आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत खानापूर-विटा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका विधानाने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. "आमच्यासारखे 242आमदार पाठीशी आहेत, म्हणूनच ते मुख्यमंत्री आहेत," अशा शब्दांत सुहास बाबरांनी थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते वैभव पाटील यांच्यावर टीका करताना सुहास बाबरांचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. पळशी येथील सभेत बोलताना त्यांनी केवळ वैभव पाटलांनाच नव्हे, तर वरिष्ठ नेतृत्वालाही इशारा दिला. "मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा सुहास बाबर कोण आहेत," असे म्हणत त्यांनी ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), ठाकरे गट आणि भाजप हे सर्व आपणच चालवतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या 'वन मॅन शो'च्या दाव्यामुळे मित्रपक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा: KDMC New Mayor: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'राज्याभिषेक'!; सहा वर्षांचा प्रशासकीय वनवास संपला; हर्षाली चौधरी आणि थवील शहराचे नवे कारभारी

'भावकी'साठी पुत्राची माघार; संजयकाका पाटलांचा मास्टरस्ट्रोक?

एकीकडे विट्यात वादाची ठिणगी पडली असतानाच, तासगावच्या राजकारणात मात्र 'रक्ताचे नाते' वरचढ ठरल्याचे पाहायला मिळाले. तासगावमधील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. प्रभाकर पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून अपक्ष म्हणून शड्डू ठोकला होता. मात्र, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अनपेक्षितपणे माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

यामागे कोणतेही राजकीय दडपण नसून केवळ 'भावकी'चा आदर असल्याचे संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले. प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांचेच चुलत बंधू अक्षय पाटील (राष्ट्रवादी - शरद पवार गट) मैदानात आहेत. निवडणुकीच्या ईर्षेपोटी कुटुंबात आणि भावकीत वादाची दरी पडू नये, ही भूमिका घेत प्रभाकर पाटलांनी निवडणुकीतून पाय काढला आहे. 'घरचा वाद चव्हाट्यावर नको' या विचाराने घेतलेला हा निर्णय तासगावमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एका बाजूला सुहास बाबरांच्या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह समोर आला आहे, तर दुसरीकडे कौटुंबिक सौहार्दासाठी झालेल्या माघारीने राजकारणातील एक वेगळा पैलू समोर आणला आहे. आता जिल्हा परिषदेच्या या 'संग्रामात' जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: ICC T20 Rankings: टी20 रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर; तर सूर्यकुमार आणि इशान किशनचीही मोठी झेप


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या