Baramati Bypoll: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महायुतीचे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांच्यासमोर तब्बल 55 उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवार गटाने केलेले प्रयत्न तूर्तास यशस्वी होताना दिसत नाहीत, कारण काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवून लढत अटळ असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुनेत्रा पवार भावूक
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांना दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. "बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी पांडुरंग होता," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'बारामतीची माउली' असा करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.
निवडणूक लढवणे हा काँग्रेसचा अधिकार - शरद पवार
दरम्यान, बारामतीच्या निवडणुकीवर दिल्लीतून भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "काँग्रेस हा एक स्वतंत्र आणि मोठा पक्ष आहे. निवडणूक लढवायची की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीत कुणीतरी विरोधात असणारच हे गृहीत धरूनच मैदानात उतरावे लागते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध न होण्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही."
हेही वाचा - Rohit Pawar On Parth Pawar: 'पार्थ कुठलाही पक्ष संपत नसतो...'; काँग्रेसवरील 'डाऊनफॉल' वादावरून रोहित पवारांनी टोचले भावाचे कान
प्राजक्त तनपुरेंची अनपेक्षित माघार
तथापी, राहुरी पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर अचानक माघार घेतली. या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तनपुरेंनी माघार घेतल्यावर शरद पवार गटाने तातडीने गोविंद मोकाटे यांचा अर्ज दाखल केला. भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात आहेत, तर काँग्रेसनेही दोन उमेदवारांचे अर्ज भरल्याने येथे बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.