Fri. Sep 30th, 2022

मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस

मुंबई: राज्यात मुंबईसह कोकणामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. आजपासून १२ जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आजपासून चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, पालघर, जोगेश्वरी, अंधेरी, कांदवली, बोरवली, नालासोपारा, वसई याठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. पुढील तीन दिवस हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.