पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई!

मुंबई: मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनमुळे मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोळसत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झाली आहे. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली आहे.

मुंबई-सायन रेल्वेस्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्यामुळे मुलुंडपासून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ठप्प आहेत.याचा फटका अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. फलाटांवर हे कर्मचारी लोकलची वाट पाहत उभे आहेत. परंतु लोकल सेवा ही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे.

मुंबईतील शीव, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पाऊस सुरु आहे.

सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेसेवा थांबवण्यात आली आहे. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version