राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता इडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
यापूर्वी न्यायालयीन पातळीवर दिलासा मिळाल्यानंतर आता ईडीकडूनही क्लीन चिट मिळाल्याने भुजबळ यांच्यावरील सर्व आरोपांवर पडदा पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
नेमकं काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण?
2005 साली जेव्हा छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी दिल्लीत महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्यासाठी चमणकर एंटरप्रायजेस या कंपनीला कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय कंत्राट दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भुजबळ यांनी स्वतःच्या कुटुंबाला आणि मालकीच्या कंपन्यांना आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता.
अखेर अटक करण्यात आली
त्यानंतर या प्रकरणी 11 जून 2015 रोजी पीएमएलए PMLA अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि इतर 52 जणांचा समावेश होता. छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 13.5 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता.दरम्याने महाराष्ट्रात 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी दिली होती. त्यानंतर मार्च 2016 मध्ये ईडीने छगन भुजबळ यांची 10 तास कसून चौकशी केली आणि त्यांना अटक करण्यात आली.
2 वर्षांचा तुरुंगवास
या प्रकरणामुळे भुजबळ यांना 2016 ते 2018 या काळात सुमारे 2 वर्षांचा तुरुंगवास सोसावा लागला होता. अखेर पुराव्यांच्या अभावी आणि तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने त्यांना आता सर्व आरोपांतून मुक्त केले आहे.