जालना: राज्यभरात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असताना बदनापूर (जालना) येथे मराठी विषयाच्या पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या 15-20 मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानं झेरॉक्स सेंटरवर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पेपर सुरू, 15 मिनिटांत प्रश्नपत्रिका बाहेर!
शुक्रवारी सकाळी 11 वाजता दहावीच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याची माहिती समोर आली. यानंतर बदनापूरमधील झेरॉक्स सेंटरवर उत्तरपत्रिका छापून काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे समोर आले.
हेही वाचा : “स्टंटसाठी जीवाशी खेळ! ट्रॅक्टर चालकाचा धोकादायक स्टंट, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू”
बोर्डाची मोठी परीक्षा – निर्णय काय?
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य शिक्षण मंडळावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता बोर्ड हा पेपर रद्द करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.या गंभीर प्रकारानंतर शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार? दोषींवर कठोर पावले उचलली जातील का? याबाबत सध्या उत्सुकता आहे. अशा प्रकारांमुळे प्रशासनाच्या परीक्षेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील तपास सुरू असून अधिकृत निर्णय लवकरच अपेक्षित आहे.