Friday, May 16, 2025 01:58:03 PM

झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फुटावर जाणं भोवलं; दोर अडकवण्यास स्टूलवर चढली अन्... पुण्यात तरुणीचा मृत्यू

भोर तालुक्यातील वॉटरपार्कमध्ये झिपलायनिंग करताना 28 वर्षीय तरुणीचा 30 फूट उंचीवरून पडून मृत्यू, सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडली.

झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फुटावर जाणं भोवलं दोर अडकवण्यास स्टूलवर चढली अन्  पुण्यात तरुणीचा मृत्यू

पुणे: पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यातील राजगड वॉटरपार्कमध्ये फिरायला गेलेल्या एका तरुणीचा झिपलायनिंग करताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरल अरुण आटपाळकर असं मृत तरुणीचं नाव असून, ती पुण्यातील नऱ्हे परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती.

ही घटना शुक्रवारी 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. तरल आपल्या चुलते नंदकिशोर आटपाळकर आणि इतर कुटुंबीयांसह राजगड वॉटरपार्कमध्ये गेली होती. पार्कमधील विविध राईड्सचा आनंद घेत असताना, तरलने झिपलायनिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा साहसी खेळ तिच्या आयुष्याचा शेवट ठरेल, याची कल्पना कुणालाही नव्हती.

झिपलायनिंगसाठी 30 फूट उंचीवर गेल्यानंतर, तरलने सुरक्षा दोर रेलिंगला लावण्यासाठी लोखंडी स्टूलचा आधार घेतला. तिचा हात रेलिंगपर्यंत पोहोचत नव्हता, त्यामुळे तिला उंची मिळवण्यासाठी स्टूलवर उभं रहावं लागलं. पण दुर्दैवाने स्टूल हलल्यानं तिचा तोल गेला आणि ती थेट 30 फूट उंचीवरून जमिनीवर कोसळली. ही दुर्घटना एवढी गंभीर होती की तिला जागीच प्राण गमवावा लागला.

हेही वाचा: रूंदे-टिटवाळा रस्त्यावर टँकर पलटी; अपूर्ण रस्त्यामुळे अपघात, चालक गंभीर जखमी

या घटनेमुळे आटपाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरलचे कुटुंबीय आणि उपस्थित पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक तपास सुरू केला. नंदकिशोर आटपाळकर यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मात्र या घटनेनंतर वॉटरपार्कच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. झिपलायनिंगसारख्या साहसी खेळासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नव्हती, हे या अपघातातून स्पष्ट झाले आहे. स्टूलवर उभं राहून सुरक्षा दोर लावणे ही अतिशय धोकादायक कृती होती, आणि पार्क प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप कुटुंबीय आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले, हेच या अपघातातून दिसून येतं. या दुर्दैवी घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील वॉटरपार्क आणि साहसी खेळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


सम्बन्धित सामग्री