Thursday, February 12, 2026 06:49:45 PM

Borivali Railway Station: 8K स्क्रीन, 381 मार्गांचं डिजिटल जाळं...बोरिवली स्थानकात देशातील सर्वात मोठी यंत्रणा सज्ज

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वक्तशीर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे अत्याधुनिक 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग' प्रणाली कार्यान्वित केली आहे.

borivali railway station 8k स्क्रीन 381 मार्गांचं डिजिटल जाळंबोरिवली स्थानकात देशातील सर्वात मोठी यंत्रणा सज्ज

Borivali Railway Station:  पश्चिम रेल्वेवरील सर्वात गजबजलेल्या बोरिवली रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वक्तशीर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे अत्याधुनिक 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग' प्रणाली कार्यान्वित केली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होऊन तांत्रिक बिघाडांमुळे होणारा खोळंबा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

जुनी 'रिले' सिस्टीम बाद, डिजिटल युग सुरू

कांदिवली ते बोरिवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून अनेक दशकांपासून सुरू असलेली जुनी 'रिले-बेस्ड' सिग्नलिंग यंत्रणा हटवण्यात आली आहे. त्याऐवजी आता संपूर्ण डिजिटल नियंत्रण असलेली प्रणाली बसवण्यात आली आहे.

अशी आहे ही 'स्मार्ट' सिस्टीम 

नव्या सिस्टीममुळे रेल्वे मार्ग बदलणे आणि सिग्नल देणे हे आता मानवी हस्तक्षेपाऐवजी पूर्णपणे स्वयंचलित आणि अचूक होणार आहे.

विशाल नेटवर्क: एकूण 381 रेल्वे मार्ग एकाच प्रणालीशी जोडले गेले आहेत.
डिजिटल सिग्नल: 56 सिग्नल्स आता डिजिटल पद्धतीने नियंत्रित केले जातील.
ट्रॅक पॉइंट्स: रेल्वे मार्ग बदलण्यासाठी लागणारे 90 स्विचेस आता इलेक्ट्रॉनिक नियंत्रणाखाली असतील.
रिअल टाइम ट्रॅकिंग: गाड्यांची अचूक स्थिती समजण्यासाठी 123 ट्रॅक सर्किट्स बसवण्यात आले आहेत.

हेही वाचा - AC Local Time Table: घामाच्या धारा विसरा, आता गारेगार प्रवास करा; पाहा पश्चिम रेल्वेच्या नव्या एसी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक

कंट्रोल रूममध्ये '8K' स्क्रीनचा जलवा

बोरिवली स्थानकात यासाठी एक हायटेक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. येथे 65 इंची दोन 8K डिजिटल स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर प्रत्येक लोकल नेमकी कुठे आहे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, याची माहिती रिअल-टाइम (प्रत्यक्ष वेळेत) दिसणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळी (Peak Hours) गाड्यांचे नियोजन करणे रेल्वे नियंत्रकांना अधिक सोपे होणार आहे. 2026 च्या सुरुवातीपर्यंत ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मुंबई उपनगरीय रेल्वेमधील ही सर्वात मोठी आणि प्रगत सिग्नलिंग सिस्टीम ठरणार आहे.

प्रवाशांना नेमका काय फायदा?

या यंत्रणेमुले गाड्या वेळेवर धावतील आणि एकामागे एक गाड्या थांबून राहण्याचे प्रमाण कमी होईल. गाड्यांची ये-जा वेगवान झाल्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी लवकर ओसरेल. तसेच डिजिटल यंत्रणेमुळे मानवी चुकांची शक्यता कमी होऊन सुरक्षितता वाढेल.
 


सम्बन्धित सामग्री