आज राज्यभरात बारामती राहुरी पोटनिवडणूकचे बिगुल वाजत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेसाठी आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती. या 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे. दरम्यान अजितदादांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे.
सुनेत्रा पवारांची आघाडी प्रत्येक फेरीगणिक वाढत गेली आहे. पहिल्या फेरीत 6,500 मतांची आघाडी तिसऱ्या फेरीपर्यंत 26,773 वर पोहोचली, तर चौथ्या फेरीत ती 36,377 इतकी तर पाचव्या फेरीत 44796 झाली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण मतदारसंघात निर्माण झालेली सहानुभूतीची लाट मतपेटीतून स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच त्यांची पकड मजबूत ठेवली आहे. त्यामुळे त्यांचा विजय स्पष्टपणे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमिवर त्यांचे कार्यकर्ते जंगी सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. याचपार्श्वभूमिवर सुनेत्रा पवार यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांना सूचक आवाहन दिले आहे.
हेही वाचा- Baramati Byelection Result 2026 : सुनेत्रा पवारांविरोधात लढणाऱ्या करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले पिछाडीवर
यावेळी सुनेत्रा पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, "आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!"
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेसाठी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे. तसेच भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती. त्याचाही निकाल आज जाहीर होणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान या निवडणूकीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कोण बाजी मारणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.