Pune Metro: वाहतूक कोंडीतून हैराण झालेल्या पुणेकरांसाठी येणारा मार्च महिना आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (Line 3) मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार असून, आयटी हबमधील प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. तसेच, अर्थसंकल्पात पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी 517 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
प्रवासाचे दोन तास आता 30 मिनिटांत
हिंजवडी ते शिवाजीनगर हे सध्याचे 2 तासांचे अंतर मेट्रोमुळे केवळ 30 मिनिटांत पार करता येईल. या मार्गाचा फायदा राजीव गांधी आयटी पार्कमधील 800 कंपन्यांमधील सुमारे 2.2 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये:
यशस्वी चाचणी: पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रोच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.
23 स्थानकांचे जाळे: या मार्गावर एकूण 23 स्थानके असून 14 मेट्रो ट्रेनसेट सज्ज आहेत.
विद्यापीठ चौकात ट्रिपल लेयर उड्डाणपूल: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विद्यापीठ चौकात अत्याधुनिक रचना केली आहे. सर्वात खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका असेल.
पुढील विस्तार आणि अर्थसंकल्पातील तरतूद
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी सरकारने 517 कोटींचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून मेट्रोच्या पुढील टप्प्यात खडकवासला-स्वारगेट-खराडी, रामवाडी-वाघोली-विठ्ठलवाडी, वनाज-चांदणी चौक आणि नल स्टॉप-वारजे मार्गांचे जाळे विणले जाईल.
हेही वाचा - PMC Water Cut: उन्हाळ्यापूर्वीच पाणीकपात! पुण्यातील काही भागांत पुढील 8 ते 10 दिवस पाणीपुरवठा बंद
आयटी कर्मचाऱ्यांची 'लाईफलाईन'
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा सुधारेल. मार्चमध्ये होणाऱ्या उद्घाटनानंतर हिंजवडीतील ट्रॅफिक जॅमची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.