Mundhwa Land Scam : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या 1886 पानांच्या विस्तृत आरोपपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शीतल तेजवानी यांच्यावरच सर्व ठपके ठेवण्यात आल्याने पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
आरोपपत्रातील प्रमुख बाबी
दरम्यान, पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव आरोपी म्हणून नमूद केले आहे. सुरुवातीपासून या घोटाळ्यात चर्चेत असलेले पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव आरोपपत्रात नसल्याने त्यांना या टप्प्यावर क्लीन चिट मिळाल्याचे चित्र आहे. या कागदपत्रांमध्ये जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक अनियमिततेचे पुरावे जोडण्यात आले आहेत.
"हा तर राजकीय दलालीचा अड्डा"; अंजली दमानियांचा संताप
या घडामोडीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला असून, पुणे पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली आक्रमक भूमिका मांडली. दमानिया यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्र म्हणजे केवळ राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच असतो का? जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार अवैध असल्याचे म्हटले असताना, पार्थ पवारांना यातून कसे काय वगळले जाते?" असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. तथापी, दमानिया यांनी या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत उघड करताना सांगितले की, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी एकमेकांविरुद्ध दावे ठोकले आहेत, तर जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. असे असताना मुख्य नेत्यांची नावे आरोपपत्रात का नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - Sharad Pawar On Devendra Fadnavis: 'आमच्या बैठकीबाबत त्यांना काय ठाऊक?'; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून शरद पवारांचा फडणवीसांना खोचक टोला
न्यायाची थट्टा की कायदेशीर प्रक्रिया?
मुंढवा जमिनीच्या या व्यवहारावरून पुण्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनावर मोठा दबाव असल्याचे बोलले जात होते. आता केवळ तेजवानींवर कारवाई झाल्याने "निवडक न्याय" केला जात असल्याची टीका दमानिया यांनी केली आहे. 'न्याय' हा शब्द राजकारण्यांसाठी उरलाच नाही का, अशा शब्दांत त्यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.