Friday, March 13, 2026 02:11:54 PM

Rohit Pawar: 'अजितदादांसारखचं एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होते, पण...'; रोहित पवारांचा स्फोटक दावा

व्हीएसआर (VSR) विमान कंपनीच्या बेजबाबदारपणाचा पाढा वाचताना, त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवावर बेतलेल्या एका जुन्या घटनेचा खुलासा केला आहे.

rohit pawar अजितदादांसारखचं एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होते पण रोहित पवारांचा स्फोटक दावा

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता एक नवीन आणि भयंकर वळण दिले आहे. व्हीएसआर (VSR) विमान कंपनीच्या बेजबाबदारपणाचा पाढा वाचताना, त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवावर बेतलेल्या एका जुन्या घटनेचा खुलासा केला आहे. जानेवारी 2023 मध्ये शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी त्यांचे विमान इराण आणि इराकच्या फायटर जेट्सनी पाडण्याची धमकी दिली होती, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

इराण-इराकच्या हद्दीत नेमकं काय घडलं होतं?
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान एकनाथ शिंदे दावोसला जात असताना 'VSR' कंपनीने अत्यंत गंभीर तांत्रिक चुका केल्या होत्या. कंपनीने इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी आवश्यक असलेली 'ओव्हरफ्लाईट' परवानगी घेतली नव्हती. परवाना नसल्याने इराणच्या हवाई दलाने शिंदेंचे विमान पाडण्याचा इशारा दिला होता आणि असाच प्रकार इराकच्या हद्दीतही घडला. या संकटामुळे विमान तातडीने पुन्हा बहरीनला नेण्यात आले आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रवास सुरू झाला.

व्हीएसआर कंपनी आणि राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी केवळ जुन्या घटनाच उकरून काढल्या नाहीत, तर वर्तमान स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "व्हीएसआर कंपनीचे मालक विजय सिंह यांची मोठी ओळख असून, सरकारमधील लोक आजही त्यांची विमाने वापरत आहेत," असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करताना पवारांनी विजय सिंह यांचे व्हॉट्सअ‍ॅप रेकॉर्ड तपासण्याची आणि ते महाराष्ट्र सदनात कोणाला भेटले, याची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: 'कप्तानने ठोक दिया...'; भर पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून रोहित पवारांचा खळबळजनक दावा

सुरक्षेबाबत निष्काळजीपणा की घातपाताचा प्रयत्न?
अजित पवारांच्या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त करताना रोहित पवारांनी सुरक्षेच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे. "एवढ्या मोठ्या नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत इतका निष्काळजीपणा कसा होऊ शकतो? एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घातपाताचा प्रयत्न होता का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या गंभीर दाव्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री