Pune Metro: पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रोचे जाळे आता दक्षिण पुण्याच्या उपनगरांपर्यंत विस्तारणार आहे. शिवाजीनगर ते येवलेवाडी या साधारण 20 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव महामेट्रोने तयार केला असून, यामुळे कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.
मेट्रोचा नेमका मार्ग कसा असेल?
प्रस्तावित योजनेनुसार, ही नवीन मार्गिका हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा विस्तार म्हणून पाहिली जात आहे. मात्र, याचे काम 'महामेट्रो'मार्फत केले जाईल. या मार्गाचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
मुख्य मार्ग: शिवाजीनगर - जिल्हाधिकारी कार्यालय - कॅम्प - पुलगेट - कोंढवा - येवलेवाडी.
अतिरिक्त जोडणी (Spur Line): ज्योती चौक ते NIBM जंक्शन आणि पुढे उंड्रीपर्यंत (बिशप स्कूलजवळ) मेट्रो नेण्याचा मानस आहे.
स्थानके: साधारण दर 1 किलोमीटरवर एक मेट्रो स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती आणि वेळापत्रक
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून जमिनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. मे-जून 2026 पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर होणे अपेक्षित. तथापी, या मार्गाला पुढील वर्षी राज्य आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास 2030-31 पर्यंत ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा - Pune : अचानक मोठा आवाज आला अन् रक्ताच्या थारोळ्यात दिसली तरुणी; पुण्यात धक्कादायक प्रकार
लोकप्रतिनिधींची मागणी आणि कनेक्टिव्हिटी
आमदार योगेश टिळेकर यांनी पावसाळी अधिवेशनात कोंढवा-येवलेवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मेट्रोची मागणी लावून धरली होती. हडपसरपर्यंत मेट्रो मंजूर असतानाही या भागाला डावलले जात असल्याची तक्रार स्थानिक करत होते. या नवीन प्रस्तावामुळे खडकवासला-हडपसर-खराडी या आधीच मंजूर झालेल्या मार्गासोबतच दक्षिण पुण्याची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका 'पीपीपी' (खासगी भागीदारी) तत्त्वावर होत असली, तरी कोंढवा ते येवलेवाडी हा टप्पा थेट सरकारी यंत्रणेद्वारे (महामेट्रो) राबवला जाणार आहे.